पीटीआय, हैदराबाद/जेद्दाह

सौदी अरेबियातील मदिना शहराजवळ झालेल्या बस अपघातात किमान ४४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. मृतांमधील ४२ जण तेलंगण राज्यातील असल्याचे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. या अपघातात एक जण जखमी झाला आहे. अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

हैदराबाद येथून ९ नोव्हेंबर रोजी ५४ उमराह भाविक जेद्दाहला रवाना झाले. हे सर्व जण २३ नोव्हेंबर रोजी राज्यात परतणार होते, असे हैदराबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी सांगितले. रविवारी ५४ पैकी चार भाविक कारने तर ४४ जण बसने मक्केहून मदिनाला जात होते. मदिनापासून ४० किलोमीटर अलीकडे ही बस रस्त्याच्या कडेला थांबली असताना, स्थानिक वेळेनुसार रात्री ११च्या सुमारास (भारतीय वेळेनुसार मध्यरात्री दीड वाजता) ऑइल टँकर बसला येऊन धडकला. त्यामुळे भीषण आग लागली. या अपघातात ४२ भाविकांसह अन्य दोन स्थानिक नागरिक मृत्युमुखी पडल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तर बचावलेल्या एका भाविकाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच जेद्दाहमधील भारतीय दूतावासातील अधिकारी तातडीने घटनास्थळी रवाना झाले. भारतीय दूतावासाने जेद्दाहमध्ये साहाय्यासाठी ‘कंट्रोल रूम’ सुरू केली आहे. सौदी हज आणि उमराह मंत्रालय आणि इतर स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे मदिना येथील भारतीय दूतावासातर्फे सांगण्यात आले. दरम्यान, तेलंगण सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये मदतीची घोषणा केली आहे.

मदिना येथे झालेल्या अपघातामुळे खूप दुःख झाले आहे. प्रियजन गमावल्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. तेथील भारतीय दूतावास सर्वतोपरी मदत करीत आहे. आमचे अधिकारी सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात आहेत. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

सौदी अरेबियातील मदिनाजवळ झालेल्या हृदयद्रावक घटनेने खूप दुःख झाले आहे, मृतांमध्ये अनेक भारतीय नागरिकांचा समावेश आहे. शोकाकुल कुटुंबांप्रति माझी तीव्र संवेदना आणि जखमी लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना. या कठीण काळात मदतीसाठी परराष्ट्र मंत्रालयाने पीडितांच्या कुटुंबांशी समन्वय साधावा. – मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस</p>

सौदी अरेबियातील रस्ते अपघाताने धक्का बसला. सरकार पीडित कुटुंबांच्या पाठीशी आहे. तेथील नागरिकांच्या मदतीसाठी मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्यास सांगितले आहे. – रेवंथ रेड्डी, मुख्यमंत्री, तेलंगणा

तेलंगणमधून पथक सौदीला रवाना

अपघातातील पीडितांच्या मदतीसाठी तेलंगण सरकारने अल्पसंख्याक कल्याणमंत्री मोहम्मद अझरुद्दीन यांच्या नेतृत्वाखालील पथक सौदीला रवाना करण्याचा निर्णय सोमवारी घेतला. पीडित कुटुंबातील प्रत्येकी दोन जणांना सौदीत नेण्यात येणार आहे. अपघातातील मृतांवर सौदीतच अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले.