पीटीआय, जम्मू

जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवार जिल्ह्यामध्ये गुरुवारी ढगफुटीत किमान ४६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मृतांमध्ये दोन ‘सीएसआयएफ’च्या जवानांचाही समावेश आहे. चिखल आणि गाळात अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी व्यापक बचाव व मदतकार्य सुरू असून आतापर्यंत १६७ जणांची सुटका करण्यात यश आले आहे. त्यापैकी ३८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. किमान २०० जण बेपत्ता असल्याचे वृत्त ‘रॉयटर्स’ने दिले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

किश्तवारपासून ९० किलोमीटर अंतरावरील चोसिटी या दुर्गम गावाजवळ दुपारी १२ ते १ दरम्यान ढगफुटी झाली. या वेळी मचैल मातेच्या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात भाविक जमले होते. ९,५०० फूट उंचावर असलेल्या या मंदिराकडे जाणारी ८.५ किलोमीटरची पायवाट चोसिटीपासून सुरू होते. ही यात्रा ५ सप्टेंबरपर्यंत चालणार होती, मात्र ढगफुटीनंतर ती सध्या स्थगित करण्यात आली आहे. यात्रेसाठी चोसिटीमध्ये लंगर, दुकाने आणि सुरक्षा चौकी उभारण्यात आली होती. ढगफुटीमुळे अचानक आलेल्या पुराने लंगरमध्ये सर्वाधिक नुकसान झाले. त्याशिवाय अनेक दुकाने आणि सुरक्षा चौकी वाहून गेली. तसेच डोंगरपायथ्याशी असलेल्या अनेक घरांनाही तडाखा बसला. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी किश्तवारचे उपायुक्त पंकज कुमार यांच्याशी संवाद साधल्याचे ‘एक्स’वर लिहिले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ), पोलीस, सैन्य आणि स्थानिक स्वयंसेवक बचाव व मदतकार्यात सहभागी झाले आहेत.

या दुर्घटनेनंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि इतर नेत्यांनी दु:ख व्यक्त केले. तसेच मुख्यमंत्री अब्दुल्ला यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना चोसिटीमधील घडामोडींची माहिती दिली.

विद्याुत प्रकल्पांकडे अंगुलीनिर्देश

जम्मू-काश्मीरमधील भाजप नेते जहानझैब सिरवाल यांनी ढगफुटीमुळे झालेल्या प्राणहानीबद्दल दु:ख व्यक्त करतानाच, किश्तवारमध्ये मोठ्या प्रमाणात विद्याुत प्रकल्प सुरू असल्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होत असल्याचे ‘एक्स’वर लिहिले.

किश्तवारमध्ये विद्याुत प्रकल्पांच्या संख्येत अनियंत्रित वाढ होत आहे. विकास आवश्यक असला तरी, या प्रकल्पांमुळे पर्यावरणाला मोठा धोका उद्भवत असल्याचे त्यांनी नमूद केले. केंदाने याची तातडीने तपासणी करावी अशी विनंतीही सिरवाल यांनी केली.

आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. बचाव व मदतकार्य सुरू आहे. दुर्घटनाग्रस्तांना शक्य ती सर्व मदत पुरवली जाईल. नरेंद्र मोदीपंतप्रधान