5 children found hiv positive after blood transfusion : एका रुग्णालयातून अत्यंत धक्कादायक बाब समोर आली असून येथे पाच अल्पवयीन मुलांना रक्त चढवण्यात आल्यानंतर त्यांना एचआयव्हीची लागण झाल्याचा प्रकार घडला आहे. झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील चाईबासा येथील सदर रुग्णालयात ही घटना घडली. येथे थॅलेसेमियाने (thalassemia) ग्रस्त असलेल्या किमान पाच अल्पवयीन मुलांना रक्त संक्रमणनंतर त्यांना एचआयव्हीची लागण झाल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर राज्य आरोग्य विभागाने या प्रकरणाची उच्च-स्तरीय चौकशी सुरू केली आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, जेव्हा १३ सप्टेंबर रोजी रक्त देण्यात आल्यानंतर एका रुग्णाची १८ ऑक्टोबर रोजी फॉलो-अप चाचणी घेण्यात आली आणि तेव्हा ती एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळली. मुलाच्या वडिलांनी नंतर रक्तपेढीच्या टेक्निशियनविरोधात निष्काळजीपणाचा आरोप करत तक्रार दाखल केली.
माध्यमांमध्ये या घटनेचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर झारखंड उच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली. झारखंड राज्य एड्स नियंत्रण सोसायटीचे (JSACS) एक पथकाने, आरोग्य सेवा संचालक डॉ. दिनेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली, २५ ऑक्टोबर रोजी चाईबासा येथे भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांना कथितरित्या एचआयव्ही पॉझिटिव्ह असलेले आणखी चार मुले आढळले, ज्यामुळे एकूण पीडितांची संख्या पाच झाली आहे.
उपायुक्त चंदन कुमार म्हणाले की बाधित मुलांना दर १५ ते ३० दिवसांनी अनेक वर्षांपासून रक्त दिले जात आहे. “किट्सच्या माध्यामातून काही काळापूर्वी केलेल्या तपासणीत पाच पॉझिटीव्ह रुग्ण समोर आले आहे, ज्यांची यापूर्वी कधीही चाचणी झालेली नव्हती,” असेही ते म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितले की, प्रशासन सध्या पुढील तपासण्यांमधून निकालाची खात्री करणे, रक्तदात्यांच्या डेटाबेसचा शोध घेणे, आणि संक्रमण आढळून न आलेल्या एचआयव्ही-पॉझिटिव्ह रक्तदात्यामुळे झाले आहे किंवा नाही याची पडताळणी करणे या तीन आघाड्यांवर काम करत आहे. ते म्हणाले की या पाचही मुलांचे रक्तगट वेगवेगळे आहेत. यावरून संक्रमण एकाच रक्तदात्याकडून नाही तर वेदवेगळ्या स्त्रोतांपासून झाले असण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी सूचित केले.
संसर्ग झालेल्या पाचपैकी तीन मुले आदिवासी कुटुंबांतील आहेत आणि या सर्वांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
