दोन दिवस पेट्रोल आणि डिझेलचे भाव स्थिर राहिल्यानंतर आज पुन्हा एकदा कंपन्यांनी इंधनाचे दर वाढवले. इंधनाचे दर वाढण्यामागे दोन मुख्य कारणं सांगितली जात आहे. पहिलं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या दरांमध्ये झालेली वाढ आणि दुसरं म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारकडून इंधनाच्या मूळ दरावर आकारला जाणार कर. मात्र या दरवाढीच्या काळामध्ये काही राज्यांनी सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेत कर कमी केला आहे. नागालॅण्डमधील सरकारनेही इंधवावरील कर कमी केला आहे. नागालॅण्ड सरकारच्या अर्थ विभागाच्या सचिवांनी जारी केलेल्या एक पत्रकामधून कर कमी करण्यासंदर्भातील माहिती दिली आहे. पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करण्यात आले असून नवीन दर हे २२ फेब्रवारीपासून लागू झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागालॅण्ड सरकारने पेट्रोलवर आकारण्यात येणारा कर २९.८० वरुन २५ टक्क्यांवर आणला आहे. म्हणजेच आता प्रति लीटर पेट्रोलसाठी १८.२६ रुपये कर देण्याऐवजी १६.०४ रुपये कर मोजावाल लागणार आहे. तर डिझेलवर आता ११.०८ रुपयाऐवजी १०.५१ रुपये कर द्यावा लागणार आहे. एकंदरितच एक लीटर पेट्रोल २.२२ रुपयांनी तर डिझेल ५७ पैशांनी स्वस्त झालं आहे.

यापूर्वी पश्चिम बंगाल, राजस्थान, आसाम आणि मेघालयमधील राज्य सरकारांनी इंधनावरील कर कमी करण्याची घोषणा केलीय. राजस्थानमधील श्रीगंगानगर आणि हमनुमानगढ जिल्ह्यामध्ये पेट्रोलचे दर १०० रुपये प्रति लीटरहून अधिक झाले होते. त्यानंतर राजस्थान सरकारने इंधनावरील कर ३८ टक्क्यांवरुन ३६ टक्क्यांवर आणला.

पश्चिम बंगालमध्ये प्रति लीटर पेट्रोल आणि डिझेलवर कर म्हणून आकारण्यात येणाऱ्या रक्कमेमधून सरकसकट एक रुपया कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याप्रमाणे आसाम सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील प्रति लीटर कर पाच रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मेघालय सरकारने पेट्रोल डिझेलचे भाव कमी करणाऱ्या पाच राज्यांच्या शर्यतीमध्ये बाजी मारलीय असं म्हणता येईल. येथील सरकारने प्रति लीटर पेट्रोल मागे ७.४ रुपये तर डिझेलवरील कर ७.१ रुपये प्रति लीटरने कमी केला आहे. मेघालय सरकारने पेट्रोल-डिझेलवरील कर ३१.६२ वरुन थेट २० टक्क्यांवर आणला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 states cuts vat on petrol diesel amid rising prices includes nagaland meghalaya assam west bengal rajasthan scsg
First published on: 23-02-2021 at 15:21 IST