India vs Pakistan Operation Sindoor Latest Updates : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याचा बदला म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले आहे. ७ मे रोजीच्या मध्यरात्री भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात पाच हाय प्रोफाइल दहशतवाद्यांचा खात्मा झाला असल्याची माहिती भारतीय सुरक्षा अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं.
ज्या दहशतवादी स्थळांना लक्ष्य करण्यात आले त्यात बहावलपूर (जैश-ए-मोहम्मद – जेईएमचा बालेकिल्ला) आणि मुरीदके (लष्कर-ए-तैयबा – एलईटीचा तळ) यांचा समावेश होता. या कारवाईत लष्कर-ए-तय्यबा (एलईटी) आणि जैश-ए-मोहम्मद (जेईएम) या दहशतवादी संघटनांमधील प्रमुख व्यक्तींना लक्ष्य करण्यात आले.
लष्कर ए तय्यबा संघटनेचा दहशतवादी मुदस्सर खादियान खास, जैश ए मोहम्मद संघटनेचा हाफिज मुहम्मद जमील, जैश ए मोहम्मद संघटनेचा दहशतवादी मोहम्मद युसूफ अझहर, लष्कर ए तय्यबा संघटनेचा दहशतवादी खालिद, जैश ए मोहम्मद संघटनेचा दहशतवादी मोहम्मद हसन खान या दहशतवाद्यांचा या हल्ल्यात खात्मा झाला.
कोण आहेत हे दहशतवादी?
मुदास्सर खादियान खास – लष्कर ए तय्यबाचा दहशतवादी मुदास्सर खादियान खास हा मरकज तय्यबाचा प्रमुख आहे. त्याच्या मृत्यूनंतर पाकिस्तानी लष्कराकडून त्याला गार्ड ऑफ ऑनर देण्यात आळा. जेयुडीच्या हाफिज अब्दुल रौफकडून सरकारी शाळेत त्याच्यासाठी शोकसभा आयोजित करण्यात आली होती.
हाफिज मुहम्मद जमील – जैश ए मोहम्मद संघटनेचा दहशतवादी हाफिज मुहम्मद जमील हा मसूद अजहरचा मोठा मेहुणा आहे. मरकज सुभानअल्लाहचा तो प्रमुख होता. कट्टरपंथीय तरुणांसाठी आणि जैश ए मोहम्मद संघटनेच्या निधी उभारणीत तो सक्रिय होता.
मोहम्मद युसूफ अजहर – मोहम्मद युसूफ अजहर उर्फ उस्ताद उर्फ मोहम्मद सलीम उर्फ घोसी साहब हा जैश ए मोहम्मद संघटनेचाच सदस्य होता. तोही मसूद अजहरचा मेहुणा होता. जैश ए मोहम्मद संघटनेची शस्त्रे सांभाळण्याचे कार्य त्याच्याकडे होतं. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा हात होता. आयसी-१८४ हायजॅक प्रकरणात तो वॉन्टेड दहशतवादी होता.
खालिद – खालिद उर्फ अबू अकाशा हा लष्कर ए तय्यबाचा सदस्य होता. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा हात होता. अफगाणिस्तानातून शस्त्रांची तस्करी करण्यात तो सक्रिय होता. फैसलाबाद येथे त्याच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले. त्याच्या अत्यंसंस्काराला पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी आणि फैसलाबादचे उपआयुक्त आले होते.
मोहम्मद हसन खान – जैश ए मोहम्मदचा सदस्य असलेल्या मोहम्मद हसन खान याचाही या हल्ल्यात खात्मा झाला. पाकव्याप्त जम्मू काश्मीर येथील जैश ए मोहम्मदचे ऑपरेशनल कमांडर मुफ्ती असगर खान काश्मिरीचा तो मुलगा होता. जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या अनेक हल्ल्यांमध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता.