50-year-old is branded a witch tortured Crime News : झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यात ‘डायन (चेटकीण’) असल्याच्या संशयातून एका ५० वर्षीय महिलेचे अपहरण करून तिचा छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जादूटोणा केल्याच्या आरोपांनंतर सात जणांच्या टोळक्याने महिलेचे तिच्या घरातून अपहरण केले, तिचा छळ केला आणि २४ तासांनंतर तिच्या घरापासून जवळपास सात किलोमीटर अंतरावरील एका बाजारात रात्री उशीरा तिला फेकून दिले.
बिहारमधील एक स्थलांतरित मजूर असलेल्या या महिलेच्या मुलाने द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना याबद्दल सविस्तर माहिती दिली. “त्यांनी तिचे मुंडन केले, रक्त काढण्यासाठी ब्लेडने तिला अनेक जखमा केल्या, मोठ्याने मंत्रोच्चार केला आणि तिला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांनी आमच्या घरातून २०,००० रुपये पळवले आणि नंतर मला फोन करून १ लाख रूपयांची मागणी केली, जर ते दिले नाहीत तर तिची हत्या करू आणि मृतदेह फेकून देऊ अशी धमकीही दिली,” असे या महिलेच्या मुलाने सांगितले.
या प्रकरणात पोलिसांनी पाच पुरूष आणि ४० आणि ५५ वर्षीय दोन महिलांची आरोपी म्हणून ओळख पटवली आहे. यांच्यापैका एकजण ‘ओझा’ किंवा तांत्रिक आहे. ज्याला कोडेर्मा जिल्ह्यातून विधी करण्यासाठी आणण्यात आले होते.
त्या महिलेच्या मुलाने सांगितले की, जादूटोण्याचे आरोप गेल्या काही महिन्यांपासून सुरू होते. “हे लहान गोष्टींपासून याची सुरूवात झाली. एक म्हैस मेली. कोणीतरी आजारी पडला. नंतर, जेव्हा गावात एक माणूस मेला, तेव्हा माझ्या आईकडे बोटे दाखवली गेली. ते म्हणाले की याला ती जबाबदार आहे,”
एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर पंचायत बोलावण्यात आली. “२००७ मध्ये माझ्या वडीलांच्या मृत्यूपासून मी तिची काळजे घेत आहे तरीही त्यांनी मला कळवले नाही. अजूनही माझ्या आईविरोधातील आरोपांवर चर्चा करण्यासाठी गाव पंचायत होत असल्याबद्दल मला कोणीही सांगितले नाही,” असेही तो म्हणाला.
तसेच गावाचे प्रमुख आणि समाजाच्या इतर नेत्यांनी हे आरोप थांबवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत, उलट याला प्रोत्साहन दिले असा दावाही या कुटुंबाने केला आहे. १८ जुलै रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास, सात जण त्यांच्या घरात घुसले. तसेच पीडित महिलेच्या सुनेला जर आरडाओरडा केला तर जीवे मारण्याची धमकी दिली, असेही सांगण्यात आले.
आरोपींनी एका घरात काही विधी केले आणि महिलेला मारहाण केली. “त्यांनी तिच्या डोळ्याखाली, छातीवर, नाभीवर, बोटावर आणि पायाच्या बोटावर जखमा केल्या. ते तिची जीभ बाहेर ओढून काढण्याबद्दलही बोलत होते,” असा आरोप महिलेच्या मुलाने केला.
१९ जुलै रोजी पहाचे ३ वाजता तिला बिहारच्या गया येथील टेकडीवर नेण्यात आले. “तेथे त्यांनी तिला ओरडायला भाग पाडले, आणि तिला सांगितले की जर तिने तसं केलं नाही तर गावात सार्वजनिकरित्या तिला मारहाण केली जाईल,” असा आरोप महिलेच्या मुलाने केला.
नंतर अपहरणाच्या जवळपास २४ तासांनंतर रात्री १० वाजता तीला घरापासून ७ किलोमीटर अंतरावरील एका बाजारात सोडून देण्यात आले. ही महिला जंगलातून मध्यरात्रीच्या सुमारास चालत तिच्या घरी पोहचली.
ती महिला घरी परतल्यानंतर तिचा मुलगा तिला घेऊन स्थानिक सरकारी रुग्णालयात पोहचला, त्यानंतर तिला हजारीबाग येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलं, असे त्या महिलेच्या मुलाने सांगितले. दरम्यान पोलिस अधिकारी आभास कुमार यांनी माहिती दिली की आत्तापर्यंत एक आरोपी शंभू यादव याला अटक करण्यात आली आहे. तांत्रिकासह इतर आरोपी फरार आहेत.