Pakistani Nationals in delhi : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली असून देशात राहाणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर इंटेलिजेंस ब्युरो (IB) ने राष्ट्रीय राजधानी दिल्लीत राहणार्‍या सुमारे ५,००० पाकिस्तानी नागरिकांची यादी दिल्ली पोलिसांना सोपवली आहे.

जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना देण्यात आलेले व्हिसा रद्द केले आहेत

परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाने (FRRO) पाकिस्तानी नागरिकांची ही यादी दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेला सोपवली आहे आणि पुढील पडताळणी आणि ओळख पटविण्यासाठी ती संबंधित जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना दिली जाणार आहे. या यादीमध्ये ज्यांच्याकडे दीर्घ काळासाठीचा व्हिसा आहे अशा हिंदू पाकिस्तानी नागरिकांची देखील नावे आहेत.

ही यादी संबंधीत जिल्ह्यांना पडताळणीसाठी पाठवली आहे आणि पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या मायदेशी परत जाण्यास सांगण्यात आले आहे. मध्य आणि उत्तर पूर्व जिल्ह्यांमध्ये राहत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांची संख्या जास्त आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

या प्रकरणासंबंधी एक बैठक बोलावण्यात आली असून दिल्ली पोलिसांना या प्रकरणात त्वरित कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. तसेच वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, अशी माहितीही देण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल ब्रांचला आणि गुप्तचर विभागाला दिल्लीत राहाणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची माहिती गोळा करण्याचे काम सोपवण्यात आले आहे. तसेच त्यांना लवकरात लवकर भारत सोडण्यास सांगण्याची जबाबदारी त्यांच्याकडेच देण्यात आली आहे.

दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले की त्यांच्याकडे दिल्लीत राहणाऱ्या ३००० आणि २००० पाकिस्तानी नागरिकांच्या दोन यादी आहेत. काही नावे एकमेकांशी जुळतात आणि ते दिल्लीत राहातात का याची पडताळणी करणे आवश्यक आहे कारण अनेक पाकिस्तानी नागरिक आधीच निघून गेले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गृह मंत्रालयाने शुक्रवारी, २७ एप्रिल २०२५ पासून वैद्यकीय, राजनैतिक आणि दीर्घकालीन व्हिसा वगळता पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्याबाबत एक आदेश जारी केला. २९ एप्रिल २०२५ नंतर सध्याचे वैद्यकीय व्हिसा देखील अवैध ठरतील. सरकारने नंतर स्पष्ट केले की हिंदू पाकिस्तानी नागरिकांना आधीच दिलेले दीर्घ काळासाठीचे व्हिसा म्हणजेच एलटीव्ही वैध राहतील.