राजस्थानमधील अलवर या ठिकाणाहून एका मुस्लिम कुटुंबातील ५१ गायी पोलिसांनी जप्त केल्या असा आरोप होतो आहे. काही हिंदू कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर या गायी पोलिसांनी बेकायदेशीररित्या जप्त करण्यात केल्या आणि एका गावातील गोशाळेला दिल्या, असेही या मुस्लिम कुटुंबाने म्हटले आहे. सुब्बा खान असे या आरोप करणाऱ्याचे नाव असून, ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
पोलिसांनी मात्र या मुस्लिम कुटुंबाचे सगळे आरोप फेटाळले आहेत. आमचा या घटनेशी काहीही संबंध नाही. स्थानिक लोकांनीच या गायी गोशाळेत नेल्या असे पोलिसांनी म्हटले आहे. सुब्बा खान याने मात्र पोलिसांनीच गायी जप्त केल्याचे म्हटले असून मागील १० दिवसांपासून त्या परत मिळवण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागत असल्याचेही म्हटले आहे. गायी आपल्याच असल्याचे प्रतिज्ञापत्रही त्याने किशनगढ पोलीस ठाणे आणि उपविभागीय मॅजिस्ट्रेट कार्यालयातही जमा केले आहे.