राज्यसभा निवडणुकीच्या वेळी क्राँस व्होटिंग केल्याने विधानसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या सहा आमदारांना अपात्र घोषित केले होते. या सहा आमदारांनी तीन अपक्ष आमदारांसह शुक्रवारी दिल्लीत भाजपात जाहीर प्रवेश केला. यामुळे काँग्रेसला आता मोठा धक्का मानला जात आहे. सहा आमदारांनी राजीनामा दिला असल्याने येथे १ जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार जिंकून आल्यास काँग्रेसचं सरकार कोसळण्याची शक्यता आहे.

नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सहा आमदारांनी भाजपाच्या उमेदवाराला मतदान केले होते. त्यामुळे संख्या असतानाही काँग्रेसच्या अभिषेक मनू सिंघवी यांचा पराभव झाला होता. या निवडणुकीत काँग्रेसचे सहा आमदार व तीन अपक्ष अशा नऊ जणांनी भाजपाच्या उमेदवाराला मतदान केल्याने हर्ष महाजन विजयी झाले. दरम्यान, २९ फेब्रुवारी रोजी विधानसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या सहा आमदारांना अपात्र ठरविले होते.

हेही वाचा >> अरविंद केजरीवाल यांचा तुरुंगातून संदेश; म्हणाले, “भाजपाचा द्वेष करू नका…”

भाजपाने तिकिट नाकारलं, तरी त्याच पक्षात सामिल

तसंच, आशिष शर्मा (हमीरपूर मतदारसंघ), होशियार सिंग (डेहरा) आणि केएल ठाकूर (नालागढ) या तीन अपक्ष आमदारांनी शुक्रवारी विधानसभा सचिव यश पॉल शर्मा यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आणि ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत या तिन्ही अपक्ष आमदारांनी भाजपाचं तिकीट मागितलं होतं परंतु त्यांना तिकीट नाकारण्यात आलं आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. मात्र, नंतर काँग्रेसने ४० आमदारांसह सरकार स्थापन केले तेव्हा तीन अपक्षांनी सरकारला पाठिंबा दिला.

मुख्यमंत्र्यांवर नाराजी

भाजपात प्रवेश केलेल्या अपक्ष आमदारांनी सांगितले की, मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू अशा पातळीवर झुकले आहेत की ते आम्हाला आणि आमच्या कुटुंबियांना लक्ष्य करत आहेत आणि त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री सखू म्हणाले, अपक्ष आमदारांनी राजीनामे देऊ नयेत आणि जनतेच्या आदेशाचा आदर करायला हवा होता. या संपूर्ण प्रकरणामध्ये पैशांचा सहभाग होता की आमदारांवर दबाव होता, हे तपासण्याचा विषय आहे.

पोटनिवडणुकीनंतर हिमाचल प्रदेशमध्ये सत्तांतर होणार?

काँग्रेसचे सहा आमदार अपात्र ठरल्याने ६८ सदस्यीय विधानसभेत सत्ताधारी काँग्रेसचे संख्याबळ ४० वरून ३४ वर आले आहे. तर भाजपचे २५ आमदार आहेत. पोटनिवडणुकीत भाजपाचे सहा आमदार जिंकून आल्यास भाजपाचं संख्याबळ ३१ होणार आहे. तसंच, तीन अपक्षांचा पाठिंबा मिळाल्याने ही संख्या ३४ वर जाईल. त्यामुळे आगामी काळात हिमाचल प्रदेशमध्ये अटीतटीची लढत दिसणार आहे.