अमेरिकेतील बाल्टीमोर शहरात मंगळवारी सकाळी एक मालवाहू जहाज पटाप्सको नदीवरील ऐतिहासिक पूल फ्रान्सिस स्कॉट की ला धडकली. परिणामी पूल कोसळला. या अपघातात अनेक गाड्या नदीत कोसळल्या. या अपघातात बेपत्ता झालेल्या सहा बांधकाम कामगारांचा मृत्यू झाल्याची शक्यता अमेरिकन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जहाजावरील भारतीय क्रू मेंबर्सचे प्रसंगावधान राखल्याने त्यांचे आभार मानले आहेत. हे जहाज आता फ्रान्सिस स्कॉट की ब्रिजच्या ढिगाऱ्यात अडकले आहे.
बेपत्ता कामगारांचा शोध घेण्यासाठी सुरू असलेली शोधमोहीमही थांबवण्यात आली. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, पूल कोसळल्यानंतर आठ जण पटापस्को नदीत फेकले गेले, परंतु खरा आकडा अद्याप कळू शकलेला नाही. आतापर्यंत दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे.
या जहाजावर सर्व कर्मचारी भारतीय होते अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. या जहाजावरील वीजपुरवठा खंडित झाला आणि जहाजचालकाने आपत्कालीन संदेश पाठवला, त्यामुळे अधिकाऱ्यांना पुलावरील वाहतूक कमी करणे शक्य झाले असे मेरीलँडच्या गव्हर्नरनी सांगितले. हे जहाज या पुलाला कसे काय धडकले त्याचे कारण अद्याप समजले नाही.
रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, सिंगापूर ध्वजांकित दाली कंटेनर जहाज २२ भारतीय क्रू सदस्यांसह बाल्टीमोर बंदरातून निघण्याच्या काही मिनिटांतच फ्रान्सिस स्कॉट की ब्रिजवर कोसळले. हे मालवाहू जहाज कोलंबो, श्रीलंकेला जात होते.
नेमकं काय घडलं?
मालवाहू जहाज मंगळवारी सकाळी १.०४ (यूएस स्थानिक वेळेनुसार) यूएसमधील सर्वात मोठ्या शिपिंग हबपैकी एक असलेल्या बंदरातून निघाले होते आणि सुमारे २० मिनिटांनंतर जहाज पुलाच्या जवळ आले. यावेळी जहाजाला पूर्ण शक्ती कमी झाल्याचे दिसून आले, परिणामी जहाजावरील वीज पुरवठा खंडित झाला. मिनिटभराने वीज सुरू झाली. परंतु जहाजात एका भागातून धूर निघत असल्याचं दिसलं. कालांतराने जहाजावर पुन्हा अंधार पसरला. मध्यरात्री १.२७ मिनिटांनी हे जहाज पुलाच्या एका खांबाला धडकले आणि काहीच काळात हा पूल खाली कोसळला.