ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसला मोठा धक्का बसलेला. त्यानंतर आता काँग्रेस पक्षाला आणखी एका झटका बसला आहे. गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला रामराम केल्यापासून जम्मू-काश्मीरमध्ये आतापर्यंत ६४ जणांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. यामध्ये माजी उपमुख्यमंत्र्यासह, माजी मंत्री आणि काही माजी आमदारांचा समावेश आहे.
गुलाम नबी आझाद यांच्या समर्थनार्थ काँग्रेसच्या ६४ नेत्यांनी आपल्या पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री तारा चंद, माजी मंत्री अब्दुल माजिद वानी, मनोहर लाल शर्मा, घारु राम आणि माजी आमदार बलवन सिंह यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे.
याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना माजी आमदार बलवन सिंह यांनी सांगितलं की, “गुलाम नबी आझाद यांच्या समर्थनार्थं आम्ही सर्वांनी राजीनामा दिला आहे. आमचे राजीनामे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पाठवण्यात आले आहेत.” दरम्यान, यापूर्वीही अनेक माजी मंत्री, माजी आमदार, पंचायत समिती सदस्य, जिल्हा स्तरावरील नेत्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे.
“भाजपसोबत गठबंधन करणार नाही”
जम्मू-काश्मीरमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मोहिउद्दीन यांनी गुलाम नबी आझाद भाजपसोबत जात असल्याच्या वृत्ताचं खंडन केलं आहे. “आझाद हे भाजपसोबत कोणतेही गठबंधन करणार नाही आहेत. त्यांनी नवीन पक्ष स्थापन केल्यानंतर पीपल्स डेमोक्रोटीक पक्ष (पीडीपी) सोबत ते युती करतील,” अशी शक्यता मोहिउद्दीन वर्तवली आहे.
दरम्यान, गुलाम नबी आझाद यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. आझाद यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाच पानी राजीनामा पत्र पाठवले होते. “अत्यंत खेदानं आणि अंत: करणानं मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसोबतचा माझा जुना संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे,” असं आझाद यांनी सोनिया गांधींना लिहलेल्या पत्रात म्हटलं. तसेच, आझाद यांनी या पत्रातून राहुल गांधींवरही निशाणा साधला होता.