पीटीआय, श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम भागात मंगळवारी बस खोल दरीत कोसळल्याने भारत-तिबेट सुरक्षा दलाच्या (आयटीबीपी) सात जवानांचा मृत्यू झाला, तर ३२ जण जखमी झाले. हे सुरक्षा कर्मचारी अमरनाथ यात्रेचा बंदोबस्त पूर्ण झाल्यानंतर परतत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ‘आयटीबीपी’चे ३७ जवान व दोन पोलीस या बसमध्ये होते. चंदनवाडी आणि पहलगामदरम्यान खोल दरीत ही बस कोसळल्याने हा अपघात झाला. दोन ‘आयटीबीपी’ जवानांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर पाच जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

जखमी सहा सुरक्षा कर्मचाऱ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. त्यांना उपचारासाठी हेलिकॉप्टरने श्रीनगरला नेण्यात आले. उर्वरित जखमींवर अनंतनाग जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांत एका पोलिसाचाही समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती धनखड यांनी अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला.  जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा म्हणाले, की जखमी सुरक्षा जवानांना शक्य ती सर्व मदत केली जात आहे. या अपघातात आम्ही आमचे शूर जवान गमावले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी  आदींनी शोक व्यक्त करून मृतांना श्रद्धांजली वाहिली.