गाझा : इस्रायलने गाझामध्ये मंगळवारी केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये एकूण ८१ जणांचा मृ्त्यू झाल्याची माहिती स्थानिक रुग्णालयांनी दिली आहे. या हल्ल्यांमुळे या महिन्याच्या सुरुवातीला लागू झालेल्या युद्धविरामाला धक्का बसला असला तरी इस्रायलने बुधवारपासून येथे पुन्हा शस्त्रसंधी लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासवर युद्धविरामभंग केल्याचा आरोप करत सैन्याला जोरदार हल्ले करण्याचे आदेश दिले होते. त्याच्या प्रत्युत्तरात हमासने आणखी एका युद्धकैद्याचा मृतदेह परत देण्यास विलंब करण्याची घोषणा केली आहे. इस्रायली लष्कराने ३० दहशवाद्यांच्या ठिकाणांना या हल्ल्यात लक्ष्य केल्याची माहिती या वेळी दिली.
मध्य गाझातील देइर अल-बलाह येथील अल-अक्सा रुग्णालयात हल्ल्यात मृत पावलेल्या तीन महिला आणि सहा मुलांसह १० जणांना दाखल करण्यात आल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली, दक्षिण गाझातील खान युनिसमधील नासेर रुग्णालयाने ५ हवाई हल्ल्यांतील २० मृतदेह रुग्णालयात आणले गेल्याचे सांगितले. या मृतांमध्ये १३ मुले आणि २ महिला असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच अल-अवदा रुग्णालयाने १४ मुलांसह ३० जणांची हल्ल्यात मृत्यू झाल्याची नोंद केली आहे.
हमासने सोमवारी एका मृत नागरिकाचे अवशेष इस्रायलला परत दिले. मात्र याच व्यक्तीचे अर्धे अवशेष यापूर्वी देण्यात आल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला. तेव्हा नेतान्याहू यांच्या आदेशानंतर इस्रायली सैन्याने गाझामधील हमासच्या तळावर पुन्हा हल्ले सुरू केले. अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. वान्स यांनी हिंसाचारातील वाढ तात्पुरती असल्याचे सांगत परिस्थिती लवकर नियंत्रणात येईल, असा आशावाद व्यक्त केला.
