गेल्या महिन्याभरापासून मैतई आणि कुकी समुदायातील वादामुळे मणिपूर राज्यात हिंसाचार उफाळला आहे. काल (१३ जून) झालेल्या हिंसाचारात तब्बल ९ जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री १० ते १०.३० च्या दरम्यान एक गट मणिपूरच्या कांगपोक्पी जिल्ह्यातील ऐगिजांग गावात शिरला. त्यांच्याकडून गोळीबार आणि जाळपोळ करण्यात आली. या हिंसाचारात नऊ जण ठार झाले असून १० जण जखमी झाले आहेत. दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी मणिपूरला भेट देऊन शांतता समिती नेमली होती. त्यांच्या मध्यस्तीनंतरही राज्यात हिंसाचार सुरू आहे.

हिंसाग्रस्त भागात हल्लेखोर शिरल्याने सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईमुळे चकमक सुरू झाली. “गावात रात्री १०-१०.३० च्या सुमारास गोळीबार झाला. यामध्ये नऊ लोक ठार आणि १० जण जखमी झाले आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती इम्फाळ पूर्व पोलीस अधीक्षक के शिवकांता सिंग यांनी दिली. हिंसाग्रस्त भागात आता आसाम रायफल्स तैनात करण्यात आले असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आली असल्याचाही माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा >> आधी हत्या, मग मृतदेह दिवाणमध्ये ठेवून पेटवून दिला; धक्कादायक हत्या प्रकरणाचा पोलिसांनी लावला छडा!

३ मे रोजी पर्वतीय भागात राहणारा कुकी समाज आणि इम्फाळ खोऱ्यातील मैतई समुदाय यांच्यात झालेल्या हिंसाचारात किमान ११५ जण मारले गेले होते. या हिंसाचारात जवळपास ४० हजार लोक विस्थापित झाले आहेत. मैतई समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या न्यायालयाच्या आदेशाला विरोध करताना हा हिंसाचार भडकला. हळूहळू हिंसाचाराच भडका संपूर्ण राज्यभर पसरला. परिणामी अधिकाऱ्यांनी संचारबंदी लागू केली आणि इंटरनेटही बंद केले. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी येथे अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत.

हेही वाचा >> ‘लव्ह जिहाद’च्या संशयावरून उत्तराखंडच्या देवभूमीत धार्मिक तणाव; मुस्लीम संघटनेने थेट अमित शाह यांना लिहिले पत्र!

सोमवारी, मैतई आणि कुकी समुदायातील प्रमुख नागरी संस्थांनी राज्यातील शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या शांतता समितीचा भाग होण्यास नकार दिला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी १ जून रोजी तणाव कमी करण्याच्या उपायांचा एक भाग म्हणून पॅनेलची स्थापना केली होती.