अमेरिकेच्या ओक्लाहोम शहराला भयंकर वादळाने सोमवारी झोडपले असून, आतापर्यंत ९० जणांचा बळी गेलाय. या शहरातील शाळा या वादळाच्या केंद्रस्थानी सापडल्या असून मृतांमध्ये शाळकरी मुलांची संख्या जास्त आहे. या वादळाचा वेग ताशी ३२० किमी असून, शेजारच्या शहरांना देखील त्याचा तडाखा बसला.
मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज ओक्लाहोमच्या वैद्यकीय निरीक्षण कार्यालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
पाऊस सुरू झाल्याने आणि अंधार पडल्याने मदत कार्यात अडथळे आले आहेत. १४० जणांवर उपचार सुरू असून, त्यामध्ये ७० लहान मुले आहेत. काहींची स्थिती चिंताजनक आहे.
पालक आपल्या मुलांची शोधा-शोध करीत असल्याचे चित्र ह्रदय पिळवटून टाकणारे आहे, असे गव्हर्नर मेरी फॅलिन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ‘ऑली’ नावाच्या या वादळाने अमेरीकेतील ‘मूर’ भागात धुमाकूळ घातला. वादळामुळे घरांची, मोटारींची व ट्रकची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. राष्ट्रीय हवामान खात्याने हे वादळ सुमारे दीड तास ८ किमी रूंद पट्ट्यातून वाहात होते, असे सांगितले.