वडिलांनी कामावर जाताना सोबत नेण्यास नकार दिल्याने दहा वर्षाच्या मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलाने घरातील पंख्याला गळफास लावून आयुष्य संपवलं. नोएडामधील निठारी गावात बुधवारी ही घटना घडली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मुलगा सरकारी शाळेत चौथी इयत्तेत शिकत होता. आत्महत्या केली त्यादिवशी बुधवारी तो घरीच थांबला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवेन दास रिक्षाचालक म्हणून काम करतात तर पत्नी सेक्टर २५ मध्ये घरकाम करते. हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. “घटना घडली तेव्हा मुलगा घरात एकटा होता अशी माहिती कुटुंबाने दिली आहे. मुलाच्या वडिलांनी सांगितल्यानुसार सकाळी जेव्हा ते कामावर चालले होते तेव्हा मुलाने आपल्याला सोबत घेऊन जाण्याचा हट्ट केला. पण पाऊस पडत असल्या कारणाने त्यांनी नकार दिला आणि घरीच थांबायला सांगितलं. यावेळी चिडलेल्या मुलाने आत्महत्या करण्याची धमकी दिली”, असं पोलीस अधिकारी राजवीर सिंह चौहान यांनी सांगितलं आहे.

मुलाची समजूत काढण्यासाठी वडिलांनी त्याला काही पैसेदेखील दिले. तसंच पुढच्या वेळी घेऊन जाईन असंही सांगितलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. “त्यावेळी मुलाची आई घरात नव्हती. जेव्हा ११ वाजता त्या घरी आल्या तेव्हा मुलाने दुपट्ट्याच्या सहाय्याने गळफास घेतला असल्याचं त्यांनी पाहिलं. यानंतर त्यांनी पतीला फोन केला आणि माहिती दिली”, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

मुलाला रुग्णालयात नेण्यात आलं पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवला आहे.