तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर भयानक परिस्थिती पाहायला मिळत आहे. अक्षरशः थरकाप उडवणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहेत. अफगाणिस्तानातील अनेक नागरिक सामान न घेताच देश सोडून पळत असल्याचे चित्र दिसत आहे. काही विमानाला लटकून देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत तर काही कुटुंबीयांसोबत घरात लपून बसले आहेत. दरम्यान तालिबान्यांचा लहान मुलांच्या पार्कमध्ये खेळतानाचा व्हिडीओ समोर आला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. पण दुसऱ्याच दिवशी तालिबान्यांनी या पार्काला आग लावली असल्याचे समोर आले आहे.

एका व्हिडीओमध्ये तालिबानी लहान मुलांच्या पार्कमध्ये खेळताना दिसत होते. काहीजण घोड्यावर बसून आनंद घेत होते तर काही इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये बसून मस्ती करताना दिसत होते. तालिबानी हातात हत्यारे घेऊन असल्याचे देखील दिसत होते. आता तालिबान्यांनी या पार्काला आग लावली आहे. पार्क जळत असतानाचे काही व्हिडीओ समोर आले आहेत.

आणखी वाचा : ‘तुम्हाला यांनी हरवलंय?’, तलिबानींचा विचित्र व्यायाम पाहून अदनान सामीनं उडवली अमेरिकेची खिल्ली

काही यूजरने तालिबान्यांनी या पार्कला आग लावण्यामागचे कारण देखील सांगितले आहे. या पार्कमध्ये असलेले काही पुतळे आणि मूर्ती या इस्लामाविरोधात असल्यामुळे तालिबान्यांनी पार्कला आग लावली असल्याचे म्हटले जात आहे.

यापूर्वी काबुल विमानतळावरील व्हिडीओ व्हायरल झाले होते. या व्हिडीओमध्ये तेथील नागरिक देश सोडण्यासाठी करत असलेली धडपड दिसत होती. अमेरिकी लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या लष्करी विमानात जबरदस्तीने चढताना खाली कोसळल्याने आणि विमानतळावर रेटारेटी झाल्याने मनुष्यहानी झाली होती.