गरोदर पत्नीसमोर पतीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तेलंगणामधील नालगोंडा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. ऑनर किलिंगचा संशय व्यक्त केला असून, सासरच्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे. पती, पत्नी डॉक्टरांची भेट घेऊन रुग्णालयातून जात असताना हा हल्ला झाला.

प्रणय कुमार आपली पत्नी अमृतासोबत रुग्णालयातून जात असताना अचानक त्याच्यावर हल्ला करण्यात आला. धारदार शस्त्राने प्रणय कुमारवर हल्ला करण्यात आला. हल्ला केल्यानंतर आरोपीने हत्यार तिथेच टाकून पळ काढला. प्रणय कुमार आणि अमृताचं सहा महिन्यांपुर्वीच लग्न झालं होतं. अमृताच्या कुटुंबाचा या आंतरजातीय लग्नाला विरोध होता. या रागातूनच प्रणयवर हल्ला करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे.

‘दांपत्य नियमित तपासणीसाठी रुग्णालयात आलं होतं. रुग्णालयातून बाहेर येताच एका अज्ञात व्यक्तीने मागून प्रणयच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केला. हल्ल्यानंतर त्याच्या पत्नीने वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला’, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलीस सध्या सीसीटीव्हीच्या आधारे हल्लेखोराचा शोध घेत आहेत. तसंच या हल्ल्यात प्रणयच्या सासऱ्यांचा काही हात आहे का याचीही तपासणी करत आहेत. दरम्यान प्रणयच्या कुटुंबियांना त्याचा सासरा मारुती राव यांना अटक करण्याची मागणी केली आहे. या हत्येमागे त्यांचाच हात असल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे.