२१० सरकारी वेबसाईटवरून आधार कार्ड्सचा डेटा सार्वजनिक झाल्याचे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) मान्य केले आहे. विशेष बाब म्हणजे या २१० वेबसाईट केंद्र आणि राज्य सरकारच्या किंवा त्यांच्याशीच संबंधित आहेत. नाव, पत्ता, शहर यांसारख्या गोष्टींची माहिती लीक झाली आहे. माहितीच्या अधिकारात मागवण्यात आलेल्या माहितीत हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या घटनेमुळे आधार कार्ड मधील माहिती किती सुरक्षित राहू शकते ? हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सध्या बँक खाते, मोबाईल नंबर किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी आधार कार्ड ही महत्त्वाची ओळख ठरली आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाकडे आधार कार्ड असणे सक्तीचे झाले आहे. अशात ही घटना घडल्याने आधार कार्डवर असलेल्या माहितीच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘द वायर’ या वेबसाईटने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

या सगळ्या प्रकाराची गंभीर दखल घेत या २१० वेबसाईटवरून आधारशी संबंधित माहिती हटवण्यात आली आहे असेही यूआयडीएआयने म्हटले आहे. ही सगळी माहिती सार्वजनिक होण्याची नेमकी तारीख कोणती? हे समजू शकलेले नाही. तसेच ही घोडचूक आपल्याकडून घडली नसल्याचे यूआयडीएआयने म्हटले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या अखत्यारितील सुमारे २१० वेबसाईटवरून हा सगळा डेटा लीक झाला. आधारशी संबंधित माहिती अधिक सुरक्षित राहावी यासाठी आम्ही पावले उचलत आहोत येत्या काळात अशा घटना घडू नये म्हणून प्रयत्न करणार असल्याचेही यूआयडीएआयने स्पष्ट केले आहे.

यूआयडीएआयकडून जारी करण्यात आलेल्या आधार कार्डवर देशातील प्रत्येक नागरिकाला एक १२ अंकी नंबर दिला जातो. हा नंबर त्या नागरिकाचा ओळख क्रमांक म्हणून ओळखला जातो. नागरिकाचे नाव, पत्ता आणि ओळख यासाठी हा १२ अंकी क्रमांक अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aadhaar details went public on 210 govt websites says uidai
First published on: 19-11-2017 at 21:45 IST