आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी अहमदाबादमध्ये एका रिक्षाचालकाच्या घरी जेवणाचा आस्वाद घेतला. पण अरविंद केजरीवाल रिक्षाचालकाच्या घरी जात असताना पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव रोखल्यामुळे वातावरण चांगलंच तापलं होतं. अहमदाबादमधील रस्त्यावरच हाय व्होल्टेज ड्रामा पाहण्यास मिळाला. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी पोलिसांना ‘तुम्हाला लाज वाटली पाहिजे’ अशा शब्दात सुनावलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अरविंद केजरीवाल यांनी रिक्षालाचालकाने घरी जेवण्यासाठी आमंत्रण दिलं असता, ते स्वीकारलं होतं. त्याच रिक्षाचालकाच्या रिक्षातून ते हॉटेलमधून रात्री ७,३० वाजता निघाले होते. पोलिसांनी यावेळी रिक्षा रोखली असता अरविंद केजरीवाल संतापले. पोलीस त्यांना सुरक्षेचा मुद्दा असल्याने रोखल्याचं सांगत होते. पण अरविंद केजरीवाल आपल्याला सुरक्षेची गरज नाही सांगत ती नाकारत होते. अखेर रिक्षाचालकाच्या शेजारी एका पोलीस कर्मचाऱ्याला बसवण्यात आलं आणि दोन पोलिसांच्या गाड्यांचा ताफा घेऊन अरविंद केजरीवाल रवाना झाले.

गुजरातमधील आपच्या कार्यालयावर पोलिसांची छापेमारी; केजरीवाल म्हणाले, “भाजपाच्या पायाखालची…”

अरविंद केजरीवाल यांनी यावेळी पोलिसांना जनतेमध्ये जाताना प्रोटोकॉल कशासाठी हवा? तुमचे नेते जनतेमध्ये जात नाहीत, म्हणून ते दुखी आहेत असं सांगत संताप व्यक्त केला. नेत्यांना सांगा थोडे प्रोटोकॉल तोडा आणि जतेनमध्ये जा असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला. आम्हाला तुमची सुरक्षा नको, तुमची सुरक्षा मंत्र्यांना द्या असंही ते म्हणाले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. अहमदाबामध्ये त्यांनी रिक्षाचालकांना संबोधित केलं होतं. यावेळी विक्रांत दंताने या रिक्षाचालकाने त्यांना घरी जेवण्यासाठी आमंत्रण दिलं. “मी तुमचा चाहता आहे. तुम्ही पंजाबमध्ये रिक्षाचालकाच्या घरी जेवायला गेल्याचं मी सोशल मीडियावर पाहिलं होतं. माझ्या घरीही जेवण्यासाठी येणार का?,” असं त्याने विचारलं होतं.

यानंतर लगेचच अरविंद केजरीवाल यांनी त्याचं आमंत्रण स्वीकारलं आणि घरी जेवण्यासाठी पोहोचले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aap arvind kejriwal questions gujarat police after he stops over dinner at auto drivers home in ahmedabad sgy
First published on: 13-09-2022 at 09:33 IST