आपमधून हकालपट्टी झालेल्या कपिल मिश्रांनी अरविंद केजरीवाल आणि पक्षावर केलेले आरोप आम आदमी पक्षाने फेटाळून लावले आहेत. कपिल मिश्रा यांनी भाजपशी हातमिळवणी केल्याचा आरोपही आपने केला आहे.

रविवारी ‘आप’चे माजी नेते कपिल मिश्रा यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर पक्षाचे पैसे हडपल्याचा आणि हवालामार्फत व्यवहार केल्याचा ठपका ठेवला होता. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तात्काळ राजीनामा द्यावा नाहीतर ‘त्यांची कॉलर पकडून त्यांना खेचून तिहार जेलमध्ये नेणार’ असं कपिल मिश्रा यांनी जाहीर पत्रकार परिषदेत सांगितलं.

‘आप’ चे नेते संजय सिंह यांनी भाजप करत असलेले आरोपच कपिल मिश्रा करत आहेत असं म्हणत भाजप आणि कपिल मिश्रा यांच्यात हातमिळवणी असल्याचा दावा केला.

केंद्र सरकारने आणि भाजपने अरविंद केजरीवाल यांच्या प्रामाणिकतेवर शंका उपस्थित करणं सोडून द्यावं असं त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत म्हटलं.

दरम्यान आपल्या पत्रकार परिषदेत ती परिषद संपत असतानाच कपिल मिश्रा हे भोवळ येऊन पडले. कपिल मिश्रा हे गेल्या पाच दिवसांपासून उपोषणावर असून आपच्या नेत्यांच्या परदेश यात्रांवरील खर्च जाहीर करावा अशी त्यांची मागणी आहे. पत्रकार परिषदेत भोवळ आल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी नेण्यात आलं.