अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचे चिन्ह ‘झाडू’ घराघरात असते, तर भाजपचे कमळ ठरावीक घरांमध्ये. अर्थात ज्या घरात ‘लक्ष्मी’- त्या घरात ‘कमळ’ असणारच! असो. चाटवाला दिल्लीच्या आंबेडकर नगर भागात गेला होता. आंबेडकर, फुले, शाहू, अण्णाभाऊ साठे नगर म्हटलं की एका विशिष्ट समुदायाची वस्ती- हा सार्वत्रिक समज इथेही पक्का होतो. पक्क्य़ा झोपडय़ांमध्ये अठरापगड जाती- असं दिल्लीच्या आंबेडकर नगर वस्तीचं वर्णन करता येईल. मोदींच्या सभेच्या निमित्तानं या भागात विजेच्या खांबांवर, भिंतींवर, अवैध मजल्यांवर कमळ फुललं होतं. कधी एअरपोर्टवरून आलात नि मध्य दिल्लीतलं काम आटोपलं की महाराष्ट्रातल्या कुठल्याही झोपडपट्टीचा ‘फिल’ घ्यायचा असल्यास आंबेडकर नगर एकदम योग्य जागा. म्हणजे तुंबून रस्त्यावर वाहणारी गटारं, त्यात मनसोक्त डुंबणारी डुकरं, एकेका गल्लीचा ताबा घेतलले कुत्रे स्वागताला तयार असतात. अशा भागात मोदी आले. या भागावर कधी काळी काँग्रेसचं राज्य होतं. १५ वर्षे. 

या वस्तीत प्रत्येक जातीचं संघटन व प्रति संघटना चार नेते. या नेत्यांनाही निवडणुकीच्या काळात महत्त्व येतं. देवली, आंबेडकर नगरला जायचं म्हटल्यावर साकेत मेट्रो स्टेशन जवळचं. पुण्याच्या कॅम्प अथवा मुंबईच्या सधन भागाची अनुभूती देणारा साकेतचा परिसर. झगमगाटी मॉल व त्यात गर्दी करणारी पोरं-पोरी! दुपारी तीनेक तासांसाठी हे मॉल्स बंद होते. कारण जवळच मोदींची सभा होती. त्यामुळे ‘ओह शट!’ म्हणत मॉलमध्ये ‘विंटर सेल’मध्ये शॉपिंगसाठी आलेले वैतागले होते. तेथून थोडंसं लांब गेल्यावर आंबेडकर नगरचा परिसर!
आंबेडकर नगरची झोपडपट्टी म्हणजे काहीतरी वेगळीच आहे. मुंबईपेक्षाही वेगळी. जास्त गलिच्छ. अविकसित. हे मत आहे अरुण देव यांचे. मुंबईचे माजी उपमहापौर. आंबेडकर नगरच्या डीडीए मैदानावर भेटतात. आठवडाभरापासून दिल्लीत तळ ठोकून आहेत. भाजपच्या झोपडपट्टी सेलचे पदाधिकारी. देवली, आंबेडकर नगरमध्ये प्रचाराची बॅकरूम सांभाळतात. वयाची साठी ओलांडली तरी पक्षाच्या कामासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. दिवसभर बैठका, कार्यकर्त्यांशी चर्चा- नियोजन. निवडणुकीच्या निकालांवर ठोस मत व्यक्त करत नाहीत. पण त्यांच्या बोलण्यातून दिल्लीच्या नेत्यांचं सामान्य कार्यकर्त्यांशी असलेलं तुटलेपण जाणवतं.
तर आंबेडकर नगरची वस्ती. या वस्तीत प्रचारासाठी भाजपने खास पत्रकं छापून घेतली. आंबेडकरांचा फोटो असलेली. काँग्रेसने आंबेडकरांना कशी वागणूक दिली, येथपासून ते भाजपने गेल्या नऊ महिन्यांच्या काळात दलितांसाठी काय केले याचा हिशेब दिला जातो. किरण बेदींचे भाषण म्हणजे आपच्या आरोपांना उत्तर. बेदी मुख्यमंत्री झाल्यास रस्त्यावरच्या पानटपऱ्या, झुग्गी-झोपडी, पोलिसांचे हप्ते सुरू झालेच म्हणून समजा- असा हिंदी मॅसेज दिल्लीत ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर फिरतोय. या मॅसेजला बेदी अप्रत्यक्षपणे उत्तर देऊ लागतात. ‘मी कुणाचे नुकसान करणार नाही, मी तर भलं करणार-कारण, मी ताई-माई-अक्काच्या रूपात आले आहे. त्यामुळे मी कधीही तुमच्यावर अन्याय करणार नाही’. बेदींच्या भाषणाला जुजबी प्रतिसाद मिळतो. मोदी येतात -जातात.! लोकांना परतण्याची घाई झालेली असते. पिण्याच्या पाण्याचा टँकर येणार असतो. एरवीही वाल्मिकी समुदाय बहुसंख्य असलेल्या वस्तीला स्वच्छतेचा स्पर्श झालेला असतो. कचऱ्याचे ढीग साफ झालेले असतात. दिवाळीलाही काय स्वच्छता असेल असं वातावरण असतं. मोदींच्या भाषणाचा संदर्भ देऊन सांगायचे तर- कमळावर बसूनच लक्ष्मी घरात येते. आधी ‘स्वच्छ भारत’ अभियानाचा एक एपिसोड पार पडला आहे. त्यानंतर मोदींची सभा अर्थात कमळ आलं आहे. मतदानाच्या आदल्या रात्री ‘लक्ष्मी’ येणार असते. ‘लक्ष्मी’ आली तरी वाल्मिकी समुदायाचा ‘झाडू’ सुटणार नाहीच. कारण वर्षांनुवर्षे ‘झाडू’च हातात राहील अशी व्यवस्था ‘विकसनशील’ समाजाने केलेली असते.
– चाटवाला

Srikala Reddy Singh and her husband Dhananjay Singh
नवरा तुरुंगात, बायको निवडणुकीच्या रिंगणात; कोण आहेत श्रीकला रेड्डी?
ramdas tadas
‘‘हे एकदाचं थांबवा,” रामदास तडस यांना भाजप नेत्यांचा निर्वाणीचा इशारा
bhiwandi lok sabha marathi news, bhiwandi lok sabha kapil patil
भिवंडीत कपिल पाटील यांना कट्टर विरोधक सुरेश म्हात्रे यांचे आव्हान
Ganesh Naik-Subhash Bhoirs meeting is the beginning of new political equation
गणेश नाईक-सुभाष भोईर यांच्या भेटीच्या चर्चेने नव्या राजकीय समीकरणाची नांदी?