दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि खासदार स्वाती मालीवाल यांना मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. या घटनेबाबत त्यांनी पोलीसांत तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला होता. यासंदर्भात माध्यमांमध्ये वृत्तही झळकले होते. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला नव्हता. मात्र, या प्रकरणाची चौकशी असल्याची माहिती सांगितली जात होती. आता या घटनेबाबत आम आदमी पक्षाने मोठा खुलासा केला आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या स्वीय सचिव बिभव कुमार यांनी खासदार स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन केल्याचे आम आमदी पक्षाने मान्य केलं आहे. याबाबत आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत या घटनेबाबत निषेध व्यक्त केला. तसेच या घटनेबाबत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे लवकरच योग्य ती कारवाई करतील, असं सांगितलं.

हेही वाचा : दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी ‘आप’पक्षालाच सहआरोपी करणार; ईडीची न्यायालयात माहिती

संजय सिंह काय म्हणाले?

“मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेटण्यासाठी राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल या त्यांच्या निवासस्थानी दाखल झाल्या होत्या. यावेळी त्या अरविंद केजरीवाल यांना भेटण्यासाठी थांबल्या असता स्वीय सचिव बिभव कुमार यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केले. या घटनेची माहिती स्वाती मालीवाल यांनी याची पोलिसांना दिली होती. या घटनेचा आम्हीदेखील निषेध व्यक्त करतो. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून कारवाईचे निर्देश दिले आहेत”, अशी माहिती संजय सिंह यांनी दिली. तसेच स्वाती मालीवाल या पक्षाच्या जेष्ठ नेत्या असून त्यांनी समजासाठी मोठं काम केलं असल्याचंही ते म्हणाले.

दरम्यान, खासदार स्वाती मालीवाल यांना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी मारहाण झाल्याच्या आरोपानंतर भाजपाने आम आदमी पक्षाला लक्ष्य करत टीका केली होती. भाजपाचे नेते अमित मालविय यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत आपवर हल्लाबोल केला होता. स्वाती मालीवाल या आम आदमी पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. तसेच त्या दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षादेखील राहिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाच्यावतीने त्या राज्यसभेवर खासदार झाल्या आहेत.अरविंद केजरीवाल यांच्या विश्वासू लोकांपैकी स्वाती मालीवाल या एक आहेत, असं बोललं जातं. मात्र, खासदार स्वाती मालीवाल यांना मुख्यमंत्र्‍यांच्या निवासस्थानी मारहाण झाल्याच्या आरोपानंतर मोठी खळबळ उडाली होती. याबाबत स्वाती मालीवाल यांनी स्वत: पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती. मात्र, पुढे गुन्हा दाखल झाला नव्हता. स्वाती मालीवाल यांना मारहाण झालेल्या आरोपानंतर अखेर आम आदमी पक्षाकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.