चीनमधील चौथ्या क्रमांकाची बँक असलेल्या अ‍ॅग्रिकल्चर बँक ऑफ चायनाच्या (एबीसी) प्रमुखाने भ्रष्टाचाराच्या आरोपावरून राजीनामा दिला आहे. झांग यून (५६) असे या प्रमुखाचे नाव असल्याचे वृत्तात म्हटले आहे.
चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी भ्रष्टाचाराविरोधात धडक मोहीम हाती घेतली असून त्याअंतर्गत भ्रष्टाचार आणि लाचखोरीच्या प्रकरणावरून चीनमध्ये २०१३ पासून हजारो अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
सत्तारूढ पक्षाच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने अनेक प्रकरणांचा तपास केल्यानंतर झांग यांची पदावनती करण्यात आली असून त्यांना ऑक्टोबरमध्ये दोन वर्षांसाठी परिवीक्षा कालावधी देण्यात आला आहे, असे ‘कैक्सिन’ या अर्थविषयक साप्ताहिकाने म्हटले आहे.
सदर बँकेच्या शेंझेन शाखेतील अधिकाऱ्याचीही भ्रष्टाचारप्रकरणी चौकशी सुरू आहे. हॉँगकॉँग स्टॉक एक्स्चेंजच्या संकेतस्थळानुसार झांग यांचा राजीनामा त्वरेने स्वीकारण्यात आला आहे. या संदर्भात यून यांची चौकशी करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.