महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला ‘देशभक्त’ संबोधून ‘बौद्धिक’ दिवाळखोरी दाखवणाऱ्या साक्षी महाराजांनी हिंदू महिलेने चार मुलं जन्माला घालावी, असे विधान करून काँग्रेसला भाजपवर हल्लाबोल करण्याची आयतीच संधी दिली आहे. साक्षी महाराजांच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी मोदी सरकारचे धोरण ‘अबकी बार- बच्चे चार’ असे असल्याची टीका केली आहे. सिंघवी म्हणाले की, भाजप खासदार वादग्रस्त विधाने करीत आहेत. धर्माच्या नावावर दोन समुदायांमध्ये वितुष्ट निर्माण करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच या प्रकरणी खुलासा करणे गरजेचे आहे.
शिरोमणी अकाली दलाचे नेते व पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी ‘बब्बर खालसा’शी संबधित दहशतवाद्यांना सोडण्याची विनंती पाच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यावर काँग्रेसने सत्ताधारी भाजपला जाब विचारला आहे. केंद्र व पंजाबमध्ये शिअदशी युती करणाऱ्या भाजपने यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. बादल यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात पंजाबचे माजी मुख्यमंत्री बीअंत सिंग यांच्या मारेकऱ्यांसह तेरा दहशतवाद्यांची सुटका करण्याची विनंती केली आहे. राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवादावर बोलणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिअदच्या मागणीवर काय विचार केला आहे? शिअदविरोधात भाजपमधून निषेधाचा एकही सूर उमटलेला नाही. याचा अर्थ काय काढावा, असा प्रश्न सिंघवी यांनी विचारला. बादल यांनी पश्चिम बंगाल, कर्नाटक, उत्तर प्रदेश, राजस्थान व गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दहशतवाद्यांची सुटका करण्याची विनंती केली. दिल्लीच्या नायब राज्यपालांनादेखील बादल यांनी याच आशयाचे पत्र लिहिले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Jan 2015 रोजी प्रकाशित
सरकारचे धोरण ‘अबकी बार- बच्चे चार?’
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला ‘देशभक्त’ संबोधून ‘बौद्धिक’ दिवाळखोरी दाखवणाऱ्या साक्षी महाराजांनी हिंदू महिलेने चार मुलं जन्माला घालावी, असे विधान करून काँग्रेसला भाजपवर हल्लाबोल करण्याची आयतीच संधी दिली आहे.

First published on: 08-01-2015 at 04:45 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abki baar bachche char new government policy