दादरीत गोमांस प्रकरणावरून झालेल्या हत्येमागे खरे कारण ‘लव्ह जिहाद’ असल्याचा शोध लावणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सारवासारव केली आहे. अभाविपचे उत्तर प्रदेशमधील अवध विभागाचे संघटन सचिव सत्यभान यांनी काही पश्चिम उत्तर प्रदेशमधील स्थानिक वृत्तपत्रांचा हवाला देऊन अखलाक यांच्या हत्येमागे त्यांच्या मुलाचे एका हिंदू मुलीशी असलेल्या कथित प्रेमप्रकरणातून झाल्याचा दावा केला होता. सत्यभान यांचा संदर्भ देऊन सोमवारी वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यावर अभाविपने प्रसारमाध्यमांवर ‘चुकीचे’ वृत्त प्रसिद्ध केल्याचा आरोप करून सारवासारव केली. अभाविपचे राष्ट्रीय महामंत्री श्रीहरी बोरीकर यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटले आहे की, दादरीत झालेली घटना निंदनीय आहे. अभाविपने या घटनेची चौकशी करण्यासाठी कोणतीही समिती नेमली नसल्याचे स्पष्टीकरण पत्रात देण्यात आले आहे.
दादरीतील घटना लव्ह जिहादमुळे झाली असल्याचा दावा करताना सत्यभान म्हणाले होते की, राजकीय पक्ष मूळ मुद्दय़ापासून इतरत्र लक्ष भरकटत आहेत. गोमांस खाणे, अल्पसंख्याकांचे लांगूलचालन तसेच राजकीय फायद्यासाठी याचा उपयोग करून घेतला जात आहे. १ ते ३ नोव्हेंबरदरम्यान सीतापूरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात यावर चर्चा केली जाणार असल्याचे वृत्त सत्यभान यांच्या हवाल्याने प्रसिद्ध झाले होते. मात्र हे वृत्त निराधार व तथ्यहीन असल्याचे स्पष्टीकरण अभाविपने दिले आहे. दादरी प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरू असून आरोपींना कठोर शासन झाले पाहिजे, असे पत्रात म्हटले आहे. यापूर्वी दादरी घटनेवरून केंद्रीय मंत्री डॉ. महेश शर्मा यांनी वादग्रस्त विधान केले होते.
संग्रहित लेख, दिनांक 27th Oct 2015 रोजी प्रकाशित
अभाविपची सारवासारव! दादरीप्रकरणी चुकीचे वृत्त
सत्यभान यांचा संदर्भ देऊन सोमवारी वृत्त प्रसिद्ध झाले होते.
Written by रत्नाकर पवार
Updated:

First published on: 27-10-2015 at 04:42 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abvp change statement about dadri