पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रेडिओवरून ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाला संबोधित केले.  देशवायसियांना नाताळ आणि नववर्षाच्या शुभेच्छा देतानाच स्वच्छतेच्या मुद्यावरही त्यांनी भर दिला. देशातील युवकांसाठी ‘स्टार्ट अप इंडिया ऍण्ड स्टॅण्ड अप इंडिया’ या योजनेचा ऍक्शन प्लान येत्या १६ जानेवारीला सादर करण्यात येणार आहे. या योजनेत युवकांना मोठया संधी असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले.
१५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरील भाषणात ‘स्टार्ट अप इंडिया ऍण्ड स्टॅण्ड अप इंडिया’ या योजनेची घोषणा केली होती याची आठवण करून देत या महत्त्वकांक्षी योजनेचा आराखडा येत्या १६ जानेवारीला सादर करण्यात येणार असल्याचे मोदींनी सांगितले. शारीरिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या व्यक्तींना अपंग म्हणण्याऐवजी त्यांचा उल्लेख दिव्यांग असा करण्याचा सल्ला मोदी यांनी दिला आहे. सरकारच्या योजना या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, अशीही अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान नॅशनल युथ फेस्टीव्हलसाठी युवकांनी आपले मत लिहून पाठवावे, असे आवाहन मोदींनी केले. तसेच २६ जानेवारीसाठी नागरिकांनी राज्यघटनेत दिलेल्या कर्तव्यावर काव्यरचना आणि निबंधस्वरुपात काहीतरी लिहून पाठवावे, असेही म्हटले.
डीबीटीएस, थेट लाभ हस्तांतरण योजनेला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले असून, या योजनांची यशस्वी अंमलबजावणी सुरू आहे. तुमच्या मोबाईलमध्ये ‘नरेंद्र मोदी ऍप’ डाऊनलोड करून थेट माझ्यासोबत कनेक्ट रहा. तुमच्या चांगल्या कल्पना, विचार मला कळवा, त्याचे स्वागत करू, असे आवाहनही मोदींनी यावेळी केले.