Operation Sindoor : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने मध्यरात्री ‘एअर स्ट्राईक’ करत दहशतवादी हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. या ‘एअर स्ट्राईक’मध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरच्या हद्दीतील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती सांगण्यात आली आहे. भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये दहशतवाद्यांच्या ९ तळांना लक्ष्य करण्यात आलं. यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेल्याची माहिती सांगण्यात येत आहे. तसेच या ‘एअर स्ट्राईक’मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबाचा देखील खात्मा करण्यात आला आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत सोशल मीडियावर काही दिशाभूल करणारे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. आता’ऑपरेशन सिंदूर’ संबंधित दिशाभूल करणाऱ्या कंटेंटवर माहिती आणि प्रसारण मंत्रालय लक्ष ठेवून असणार आहे. तसेच याबाबत कोणताही बेकायदेशीर कंटेंट किंवा व्हिडीओ व्हायरल झाल्यास संबंधित कंटेंटला ब्लॉक करण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिली आहे. या संदर्भातील वृ्त द इंडियन एक्सप्रेने दिलं आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावा दरम्यान अनेक सायबर हल्ल्यांना सामोरं जावं लागलं. काही वेबसाईट्स हॅक करण्यात आल्या होत्या. त्यामुळे भारतातील महत्वाची जबाबदारी असलेल्या एजन्सी किंवा वेगवेगळे विभाग त्यामध्ये ऊर्जा मंत्रालय, बँकांसह वित्तीय संस्था आणि दूरसंचार विभाग देखील ‘हाय अलर्ट’वर आहेत. तसेच आम्ही देखील हाय अलर्टवर आहोत, कारण सायबर हल्ल्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, बुधवारी दुपारी मंत्रालयांच्या अधिकाऱ्यांची एक बैठक झाली. या बैठकीत भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ संबंधित एक्स सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काही ठिकाणी चुकीची माहिती व्हायरल झाल्याचं मान्य करण्यात आलं. तेव्हा असा निर्णय घेण्यात आला की, लोक ऑनलाइन विविध दावे-प्रतिदावे करत असल्यामुळे सरकारला अशा कंटेंटवर बारकाईने लक्ष ठेवावं लागेल. तसेच अशा कंटेंटचा प्रसार रोखण्याच्या कायदेशीर पावलं उचलावे लागतील.
दरम्यान, ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवलं तेव्हा काही चुकीचे व्हिडीओ व्हायरल झाले. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या (PIB) फॅक्ट चेक विभागाने हवाई हल्ल्यांशी संबंधित काही व्हायरल दाव्यांची पडताळणी केली. अशाच एका पोस्टमध्ये डीआरडीओमधील एका शास्त्रज्ञाने ब्रह्मोस क्षेपणास्त्र घटकांमध्ये कथित बिघाड झाल्याबद्दल लिहिलेलं पत्र होतं. फॅक्ट चेक विभागाने याबाबत स्पष्ट केलं की, असा कोणताही शास्त्रज्ञ डीआरडीओमध्ये काम करत नाही, हे पत्र बनावट आहे.
एवढंच नाही तर क्रॅश झालेल्या विमानाचे काही जुने व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत होते. त्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की पाकिस्तानने ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान बहावलपूर जवळ एक भारतीय राफेल जेट पाडलं. मात्र, याबाबत नंतर चेक केलं असता हे खोटं असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या वापरकर्त्यांना संयम बाळगण्याचा आणि खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नका किंवा अशी माहिती पुढे शेअर करू नका, असं आवाहन करण्यात आलं आहे.