scorecardresearch

‘अदानी’च्या आर्थिक व्यवहारांमुळे ईएसजी गुंतवणूकदार चिंतेत

अदानी समूहाने अंतर्गत पातळीवर केलेल्या आर्थिक व्यवहारांमुळे गुंतवणूकदारांना धोक्याची जाणीव होऊन ईएसजी बाजारपेठेत नव्याने चिंता निर्माण झाली आहे.

adani group
अदानी समूह(संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

अदानी समूहाने अंतर्गत पातळीवर केलेल्या आर्थिक व्यवहारांमुळे गुंतवणूकदारांना धोक्याची जाणीव होऊन ईएसजी बाजारपेठेत नव्याने चिंता निर्माण झाली आहे. सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून गुंतवणूक करणाऱ्या अनेक कंपन्यांना आपण कळत किंवा नकळतपणे अदानी समूहाच्या माध्यमातून प्रदूषणकारक प्रकल्पांना हातभार लावला आहे का अशी शंका भेडसावत आहे. अदानी समूहातील गुंतवणूक काढून घेण्यामागे हेही एक कारण सांगितले जाते.

नॉर्वेचा सर्वात मोठा निर्वाह निधी असलेल्या केएलपीने अलीकडेच अदानी ग्रीन एनर्जीज लि. मधील आपल्या सर्व समभागांची विक्री केली आहे. अदानी एंटरप्रायजेस लि.च्या ऑस्ट्रेलियातील कारमायकल कोळशाच्या खाणीला अर्थपुरवठा करण्यासाठी तारण म्हणून अदानी ग्रीन एनर्जीज लि.च्या शेअरचा वापर केला असल्याचा आरोप हिंडेनबर्गच्या अहवालात करण्यात आला आहे.

अदानी ग्रीनच्या समभागांच्या उच्च किमतीमुळे त्यामार्फत दिल्या जाणाऱ्या तारणाचे मूल्य वाढते. परिणामी कोळसा प्रकल्पांना स्टेट बँकेने दिलेल्या कर्जाची जोखीम कमी होते आणि बँक कारमायकेल कोळसा प्रकल्पाला कमी व्याजदराने पतपुरवठा करते. अदानीचा हा प्रकल्प जगातील सर्वाधिक प्रदूषण करणाऱ्या प्रकल्पापैकी एक मानला जातो. त्या प्रकल्पाला आपल्याकडून अनवधानाने मदत झाली असावी अशी चिंता वाटून केएलपीने अदानी ग्रीन एनर्जीज लि.मधील आपली गुंतवणूक काढून घेतली आहे.

केएलपी कोळशाशी संबंधित व्यवसायामध्ये गुंतवणूक करत नाही. आंथ्रोपोसिन फिक्स्ड इन्कम इन्स्टिटय़ूट ही संस्था साधारण तीन वर्षांपासून अदानी समूहाच्या कामकाजावर लक्ष ठेवून आहे. ज्या गुंतवणूकदारांनी कोळशाच्या खाणींमध्ये गुंतवणूक करण्यास निर्बंध घातले आहेत, त्यांनी अदानी समूहामधील गुंतवणुकीचा फेरविचार करावा असा सल्ला या संस्थेमार्फत देण्यात आला आहे. एका डेटानुसार युरोपीय महासंघातील, ईएसजी लक्ष्याचा पुरस्कार करणाऱ्या ५०० पेक्षा जास्त नोंदणीकृत फंडांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अदानी समूहाचे समभाग खरेदी केलेले आहेत.

ईएसजी गुंतवणूक म्हणजे काय?
ईएसजी गुंतवणूक म्हणजे पर्यावरणीय (एनव्हायर्नमेंटल), सामाजिक (सोशल) आणि शासन पद्धत (गव्हर्नन्स) घटकांना प्राधान्य देणारी गुंतवणूक. अशा प्रकारची गुंतवणूक सामाजिकदृष्टय़ा जबाबदार, परिणामांचा विचार करणारी आणि शाश्वत मानली जाते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-02-2023 at 01:25 IST
ताज्या बातम्या