अयोध्येतील वादग्रस्त जागेवर मशीद बांधण्यासाठी तेथे असलेले हिंदूंचे मंदिर पाडण्यात आले, असे ‘राम लल्ला विराजमान’च्या वकिलांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अहवालाचा संदर्भ देत स्पष्ट केले.

रामजन्मभूमी-बाबरी मशीद या राजकीयदृष्टय़ा अत्यंत संवेदनक्षम प्रकरणात राम लल्ला विराजमान हे एक पक्षकार आहेत. पुरातत्त्व विभागाच्या अहवालामध्ये मगर आणि कासव यांच्या आकृत्यांचा संदर्भ आहे आणि त्या मुस्लीम संस्कृतीसाठी परक्या आहेत, असे ज्येष्ठ वकील सी. एस. वैद्यनाथन म्हणाले.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान आठव्या दिवशी वरील बाबी नमूद करण्यात आल्या.

वादग्रस्त जागेवर हिंदू मंदिर होते या दाव्याच्या पुष्टय़र्थ ज्येष्ठ वकिलांनी पुरातत्त्व अहवालातील अन्य संदर्भही दिले. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठामध्ये न्या. एस. ए. बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. एस. ए. नझीर यांचाही समावेश आहे.