अमेरिकी प्रतिनिधिगृहात ठराव, परराष्ट्र मंत्री केरी यांच्याकडून मात्र विमाने देण्याचे समर्थन

पाकिस्तानला एफ १६ प्रकारची अण्वस्त्रवाहू जेट विमाने विकण्यास प्रतिबंध करण्याची मागणी अमेरिकी प्रतिनिधिगृहात एका ठरावाद्वारे करण्यात आली असून परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी मात्र पाकिस्तानला ही विमाने देण्याचे समर्थन केले आहे. दहशतवादा विरोधात लढण्यासाठी पाकिस्तानला ही विमाने देत असल्याचे केरी यांनी सांगितले.

अमेरिकी काँग्रेसचे प्रतिनिधी डॅना रोहराबशर यांनी प्रतिनिधिगृहात हा ठराव मांडताना सांगितले की, पाकिस्तान सरकार अमेरिकेने दिलेली शस्त्रे बलुचिस्तानातील नागरिकांना दडपण्यासाठी वापरत आहे. पाकिस्तानच्या कृती या उर्मटपणाच्या आहेत. ओसामा बिन लादेनला पकडण्यासाठी मदत करणाऱ्या व्यक्तीचा त्या देशाने छळ चालवला आहे.

ओबामा प्रशासनाने या महिन्याच्या सुरूवातीला एफ १६ प्रकारची जेट विमाने पाकिस्तानला देण्याचे जाहीर केले. ७० कोटी डॉलर्स किंमतीची ही विमाने आहेत. ओसामा बिन लादेन हा ११ सप्टेंबर २००१ च्या हल्ल्यात तीन हजार अमेरिकी लोकांच्या मृत्यूस कारण ठरला होता, त्याला पकडून देणारी कुठलीही व्यक्ती अमेरिकेसाठी महत्त्वाची आहे. या प्रकरणात पाकिस्तानने शकील आफ्रिदी यांना अटक करून छळ चालवला आहे असा आरोप रोहराबशर यांनी केला. अमेरिकेने पाकिस्तानला लष्करी मदत करण्याचे कारण नाही, आफ्रिदीचा छळ करणारा पाकिस्तान अमेरिकेला शत्रू मानतो, असे त्यांनी सांगितले. परराष्ट्र मंत्री केरी यांनी सांगितले की, एफ १६ विमाने पाकिस्तानला दहशतवाद्यांशी लढण्याकरिता दिली जात आहेत. गेल्या काही वर्षांत पाकिस्तानात ५० हजार लोक मारले गेले आहेत. रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर रँड पॉल यांनीही पाकिस्तानला एफ १६ विमाने विकण्यास विरोध करणारा ठराव मांडला होता. अमेरिकी काँग्रेसने पाकिस्तानला आठ एफ १६ विमाने विकण्याबाबत अधिसूचना जारी केली होती, त्याविरोधातील ठरावात पॉल यांनी म्हटले होते की, पाकिस्तानला कुठल्याही प्रकारची शस्त्रविक्री करू नये.