येत्या ५ एप्रिल रोजी होणाऱ्या अफगाणिस्तानातील अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारास सुरुवात झाली खरी, मात्र प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यावर झालेल्या हल्ल्यांमुळे या निवडणुकांवर हिंसाचाराचे सावट असणार, हे स्पष्ट झाले. अध्यक्षीय निवडणुकांच्या सुरक्षिततेकडे अफगाणी लष्कराच्या क्षमतेची चाचणी म्हणून पाहिले जात आहे. रविवारी विविध उमेदवारांनी प्रचारसभा घेतल्या. ‘युद्धग्रस्त अफगाणिस्तानला बाहेर काढण्यासाठी आम्हाला मतदान करा,’ असे आवाहन उमेदवारांनी केले. मात्र हेरत येथे, माजी परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला अब्दुल्ला यांच्या ताफ्यावर अज्ञात बंदुकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात दोघे जण मृत्युमुखी पडले. त्यामुळे निवडणुका शांततेत पार पडणे, अवघड असल्याचे स्पष्ट झाले.