तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर राष्ट्रपती अशरफ घनी यांनी पलायन केलं. आता अशरफ घनी यांच्या भावाने तालिबानशी हातमिळवणी केली आहे. हशमत गनी अहमदजई यांनी तालिबानला समर्थन देण्याचा घोषणआ केली आहे. कुचिसच्या ग्रँड कॉन्सिलचे प्रमुख हशमत गनी अहमदडई याने तालिबान नेते खलील-उर-रहमान आणि धार्मिक नेते मुफ्ती महमूद झाकीर यांच्या उपस्थितीत समर्थनाची घोषणा केली. हशमत गनी सोबत आल्याने तालिबानची ताकद आणखी वाढली आहे. हशमत गनी अफगाणिस्तानातील प्रभावशाली नेते आहेत.

अशरफ घनी यांनी अफगाणिस्तानचे राष्ट्रपती असताना त्यांच्या भावाला आणि एका अमेरिकन कंत्राटदाराला खनिज प्रक्रिया परवानगी मिळवण्यास मदत केल्याचे म्हटले जाते. त्यांच्याकडे अमेरिका, दुबई, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये कोट्यवधी किमतीची जमीन आहे.

दुसरीकडे, अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांनी पैशांच्या अनेक बॅगा घेऊन देशातून पळ काढल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत असं घनी यांनी म्हटलं आहे. तसेच हे आरोप राजकीय हेतूने आणि छवी बिघडवण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप घनी यांनी केल्याचं अल झजीराने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. सोमवारी काबूलमधील रशियन दुतावासाने घनी हे मोठ्याप्रमाणात रोख रक्कम आपल्या सोबत घेऊन गेल्याचा आरोप केला होता. कार आणि हेलिकॉप्टरमधून घनी पैसे घेऊन देशातून पसार झाल्याचा दावा करण्यात आला होता.

Afghanistan Crisis: अमेरिकन सैनिकांची मदत करणाऱ्यांची शोध मोहीम; शरण न आल्यास…

घनी नक्की कुठे आहेत?

राष्ट्रपती अशरफ घनी आपल्या कुटुंबासह अबू धाबीमध्ये आहेत. संयुक्त अरब अमिराती (यूएई) च्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने या वृत्ताला दुजोरा दिलाय. मानवतेच्या आधारावर युएई राष्ट्रपती अशरफ घनी आणि त्यांच्या कुटुंबाला आश्रय देत आहे, असं यूएईने म्हटलं आहे. २० वर्षांच्या लढाईनंतर अखेर रविवारी तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला आहे. देशात हिंसाचाराला सामोरे जावं लागू नये म्हणून अनेकांनी देश सोडला आहे. दरम्यान राष्ट्रपती अशरफ घनी देखील देश सोडून पळून गेलेल्यांमध्ये आहेत.