अफगाणिस्तानच्या तालिबान प्रशासनाने रविवारी नवीन ‘इस्लामिक मार्गदर्शक तत्त्वे’ जारी केली आहेत. त्यानुसार महिला अभिनेत्रींना देशातील टेलिव्हिजन वाहिन्यांवरील मालिकांमध्ये किंवा डेली सोपमध्ये अभिनय करता येणार नाही. तसेच अफगाणिस्तानच्या प्रसारमाध्यमांना दिलेल्या निर्देशात महिला टीव्ही पत्रकार त्यांचे वृत्तांकन करताना हिजाब परिधान करतील, असे म्हटले आहे. त्यामुळे आता तालिबानने नवे महिलांसाठी पुन्हा नविन नियम लागू केले आहेत.

हा आदेश अफगाणिस्तान मंत्रालयाने सद्गुणांच्या प्रचारासाठी आणि दुर्गुणांच्या प्रतिबंधासाठी जारी केला आहे, असे तालिबानचे म्हणणे आहे. मंत्रालयाने टीव्ही चॅनेल्सना प्रेषित मुहम्मद किंवा इतर आदरणीय व्यक्ती दाखवणारे चित्रपट किंवा कार्यक्रम दाखवण्यासही मनाई केली आहे. मंत्रालयाचे प्रवक्ते हकीफ मोहाजिर यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले की, “हे नियम नसून धार्मिक मार्गदर्शक तत्त्वे आहेत. नवीन मार्गदर्शक तत्त्वे रविवारी सोशल मीडियावर शेअर करण्यात आली.

तालिबान सातत्याने दावा करत आहे की आपल्या नवीन राजवटीत महिलांनाही स्थान मिळेल, पण असे असूनही, महिलांवर अनेक निर्बंध जाहीर केले गेले आहेत. याशिवाय वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी आंदोलन करणाऱ्या अनेक अफगाण महिला पत्रकारांवर हल्ले आणि शोषण झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.