देशभरात ‘नमो चाय’चे स्टॉल उभारून भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचे तंत्र आजमावून झाल्यानंतर आता चेन्नईतील भाजप नेत्यांनी नमोंचे ‘फिश स्टॉल’ (मासळी विक्री केंद्र) सुरू करण्याची शक्कल लढविली आहे.
चेन्नईतील मरिना समुद्रकिनारी या नमो ‘फिश स्टॉल’चे उदघाटन करण्यात आले. मासळी बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या चेन्नईत हा चालताफिरता ‘फिश स्टॉल’ सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे चेन्नईच्या गल्लो-गल्ली आता मासळी विकून नरेंद्र मोदींचा प्रचार करण्याचे तंत्र भाजप नेत्यांनी सुरू केले आहे. नरेंद्र मोदींच्या हाती मासळी असलेले छायाचित्राचे पोस्टर्स वाहनावर लावण्यात आले असून या वाहनाला ‘नमो फिश स्टॉल’ असे नाव देण्यात आले आहे. या माध्यमातून चेन्नईतील मच्छिमारांना प्रोत्साहन देण्याचे आमचे उद्दीष्ट असल्याचे भाजप नेत्यांनी म्हटले आहे.