Maruti Suzuki कंपनीची नवी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कारण, देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुतीने आपल्या अनेक वाहनांच्या किंमतीत कपात केली आहे. बुधवारी कंपनीने याबाबत माहिती दिली. आजपासून(दि.25) नव्या किंमती लागू झाल्याचंही कंपनीने स्पष्ट केलं आहे.

अन्य कार उत्पादकांप्रमाणे मारुती सुझुकी कारच्या मागणीतही प्रचंड घट झाली असून ऑगस्टमध्ये या कंपनीची विक्री 34 टक्क्यांनी घसरली होती. दरम्यान, सरकारने कंपनी करामध्ये कपात केल्याने वाहनांच्या किंमती कमी झाल्याचं मारुतीने म्हटलं आहे. कंपनीने, ऑल्टो 800, ऑल्टो के10, स्विफ्ट डिझेल, सिलेरियो, बलेनो डिझेल, इग्निस, डिझायर डिझेल, टूर एस डिझेल, व्हिटारा ब्रेजा आणि एस-क्रॉस या वाहनांच्या किंमतीत कपात केल्याचं जाहीर केलं. या वाहनांच्या किंमतीत पाच हजार रुपयांची कपात झाली आहे. याशिवाय अन्य कार्स आणि डिझायर, स्विफ्ट व बलेनोच्या पेट्रोल मॉडेलच्या किंमतीत कपात झालेली नाही हे देखील कंपनीने स्पष्ट केलं.

किंमतीत करण्यात आलेली ही कपात सध्या सुरू असलेल्या ऑफर्सव्यतिरिक्त असेल. किंमतीत कपात केल्याने आगामी सणासुदीच्या काळात कारविक्रीच्या संख्येत वाढ होईल असा कंपनीला विश्वास आहे.