नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल(यू)चे नवे मंत्रिमंडळ रविवारी शपथ घेण्यास सज्ज आहे. नितीश यांच्यामागे बहुमत असल्याचे दाखवण्यासाठी त्यांची साथ देणाऱ्या राजद, काँग्रेस व भाकप या पक्षांनी नव्या सरकारमध्ये सहभागी होण्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही.
राजभवनात सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या कार्यक्रमात राज्यपाल नव्या मुख्यमंत्र्यांना शपथ देतील. राजद (२४), काँग्रेस (५), भाकप (१) व एक अपक्ष मिळून १३० आमदार राज्यातील राजकीय संकटात नितीशकुमार यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले होते. मात्र त्यांच्या मंत्रिमंडळातील सहभागाबाबत अनिश्चितता आहे.  
नितीशकुमार यांनी सभागृहात बहुमत सिद्ध केल्यानंतर काँग्रेस सरकारमध्ये सहभागी होण्याबाबत निर्णय घेईल, असे बिहार काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चौधरी यांनी सांगितले. तर, राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव हे याबाबत निर्णय घेतील, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रामचंद्र पुरबे म्हणाले. आपण मंत्रिमंडळात जायचे की नाही हे आपला पक्ष ठरवेल, असे भाकपचे एकमेव आमदार सुबोध रॉय यांनी सांगितले. अपक्ष आमदार दुलालचंद गोस्वामी यांचे मंत्रिपद नक्की झाले आहे. दरम्यान, सर्व समर्थक आमदार आणि त्यांच्या पक्षनेत्यांना नितीशकुमार यांनी शनिवारी स्नेहभोजन दिले.
जनता दलातून हकालपट्टी करण्यात आलेले जितन राम मांझी यांनी नितीश यांना शुभेच्छा देऊन,  शपथग्रहण समारंभाला हजर राहणार असल्याचे सांगितले. गरिबांच्या उत्थानाच्या घोषणा आपण प्रत्यक्षात आणण्यास सुरुवात केली, तेव्हा नितीश यांनी आपले सरकार मुदतीपूर्वीच पाडल्याचा आरोप करतानाच, गरिबांच्या कल्याणासाठीचे आपले कार्यक्रम नितीशकुमार यांनीही सुरू ठेवावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.