भारतातील आयटी कंपन्यांमध्ये सध्या कॉस्ट कटिंगचे वारे वाहताना दिसत आहेत. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना घरी बसण्याची वेळ आली आहे. काही दिवसांपूर्वीच विप्रो, कॉग्निझंट आणि इन्फोसिस या बड्या आयटी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली होती. त्यानंतर आता टेक महिंद्रानेही आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. त्यानुसार लवकरच कंपनीच्या तब्बल १५०० कर्मचाऱ्यांना निरोपाचा नारळ देण्यात येणार आहे. मोदी सरकारने काही दिवसांपूर्वीच आगामी दोन वर्षात तब्बल १ कोटी रोजगार निर्माण करण्याचा संकल्प जाहीर केला होता. मात्र, सध्याच्या घडीला भारतातील रोजगार क्षेत्रात नेमके उलट चित्र पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘दि इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार मार्च महिना उलटून गेल्याने सध्या अनेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या वार्षिक बढतीची (अप्रायजल) प्रक्रिया सुरू आहे. मात्र, यंदा आयटी आणि टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांसाठी सुगीचा समजला जाणारा हा हंगाम दु:स्वप्न ठरताना दिसत आहे. आयटी कंपन्यांकडून ही दैनंदिन प्रक्रिया असल्याचा दावा केला जात असला तरी कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रियांमधून वेगळेच चित्र समोर येत आहे. अपेक्षित कामगिरी न केल्यामुळे घरचा रस्ता दाखवण्यात आलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी आता स्वत:ची नोकरी वाचवण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे.

आयटी कर्मचाऱ्यांची संघटना असलेल्या ‘एफआयटीई’ने कालच यावरून चेन्नई आणि हैदराबाद येथील कामगार आयोगाकडे याचिका दाखल केली होती. यामध्ये कर्नाटक आणि कोईम्बतूरमधील कंपन्यांकडून तडकाफडकी करण्यात आलेल्या कर्मचारी कपातीवर आक्षेप घेण्यात आला आहे.
एकुणच सध्या कॉस्ट कटिंगच्या वाऱ्यांमुळे अनेकांच्या मानेवर टांगती तलवार आहे. यामध्ये वरिष्ठ पदावरील कर्मचाऱ्यांपासून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. यामध्ये ‘कॉग्निझंट’, ‘कॅपजेमीनी’, ‘इन्फोसिस’, ‘विप्रो’, ‘टाटा टेलिसर्व्हीसे’, ‘एअरसेल’, ‘स्नॅपडील’, ‘ली-इको’, ‘क्राफ्ट्स व्हीला’ आणि ‘यप मी’ या कंपन्यांचा समावेश आहे.

कॉंग्निझंटमधील ६ हजार म्हणजेच एकूण कर्मचाऱ्यांच्या २.३ टक्के जणांची नोकरी जाण्याची शक्यता आहे. तंत्रज्ञानामुळे काही कामांसाठी व्यक्तींची आवश्यकता भासणार नसून सुरुवातीला साधारण १ हजार कर्मचाऱ्यांना कमी करण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांना सक्तीने स्वेच्छानिवृत्ती घ्यायला सांगितले जात असून काही कर्मचाऱ्यांनी याबाबत कामगार सहायुक्तांकडे तक्रारही केली आहे.

मुंबईतील ‘कॅपजेमीनी’च्या ९ हजार कर्मचाऱ्यांची कपात होणार आहे. याबाबत कंपनीने सांगितले की, ९ हजार जणांना काढण्यात येणार असले तरीही नव्याने २० हजार जणांची भरती कऱण्यात येणार आहे. दरवर्षी कर्मचाऱ्यांचे त्यांच्या कामावरुन मूल्यांकन करण्यात येते. त्यामुळे अशाप्रकारे कर्मचाऱ्यांची संख्या कमी जास्त होत असते. याशिवाय ‘इन्फोसिस’मधील जवळपास हजार कर्मचारी आणि ‘विप्रो’, ‘एअरसेल’, ‘स्नॅपडील’ या कंपन्यांकडून तब्बल ५०० ते ७०० जणांना निरोपाचा नारळ दिला जाण्याची शक्यता आहे. तर ‘ली-इको’मधील ८५ टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांना काढण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After wipro cognizant and infosys tech mahindra plans to lay off 1500 employees
First published on: 11-05-2017 at 10:59 IST