‘अग्निपथ’विरोधातील आंदोलनाला आणखी हिंसक वळण; बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये ट्रेन पेटवली; जाणून घ्या १० महत्वाचे मुद्दे

अल्पकालीन सैन्यभरतीसाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेला होणारा विरोध आणखी तीव्र

‘अग्निपथ’विरोधातील आंदोलनाला आणखी हिंसक वळण; बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये ट्रेन पेटवली; जाणून घ्या १० महत्वाचे मुद्दे
अल्पकालीन सैन्यभरतीसाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेला होणारा विरोध आणखी तीव्र

अल्पकालीन सैन्यभरतीसाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेला होणारा विरोध आणखी तीव्र होताना दिसत आहे. तरुणांच्या असंतोषामुळे केंद्र सरकारने एक पाऊल मागे घेत या योजनेंतर्गत वयोमर्यादा २३ वर नेली आहे. मात्र यानंतरही बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये सलग तिसऱ्या दिवशी आंदोलक रस्त्यावर उतरले असून ट्रेनला आग लावली आहे.

‘अग्निपथ’ योजनेंतर्गत चार वर्षांसाठी ‘अग्निवीरां’ची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने मंगळवारी केली होती. त्यानंतर बिहारमध्ये या योजनेच्या निषेधाचा सूर उमटला. त्याचे लोण गुरुवारी उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, जम्मू, हिमाचल प्रदेश, झारखंड, राजस्थान, मध्यप्रदेशपर्यंत पोहोचले.

१) उत्तर प्रदेशातील बलियामध्ये जमावाने ट्रेनला आग लावली आहे. पोलिसांना पांगवण्याआधी आंदोलकांनी स्थानकावर उभ्या ट्रेनवर हल्ला करत तोडफोड केली. स्थानकावरील संपत्तीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलं.

२) उत्तर प्रदेशातील पूर्व भागात रस्त्यावर हातात काठ्या घेऊन उतरलेल्या आंदोलकांनी पोलिसांसोबत वाद घातला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. व्हिडीओंमध्ये तरुण मुलं हातात काढ्या घेऊन दुकानं फोडत असल्याचं दिसत आहे.

‘अग्निपथा’वरून आगडोंब!; अनेक राज्यांतील हिंसक आंदोलनामुळे सरकारचे एक पाऊल मागे

३) बलियाचे जिल्हा दंडाधिकारी सौम्या अग्रवाल यांन प्रसारमाध्यमांशी बोलताना पोलिसांनी मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यापासून आंदोलकांना रोखलं असल्याची माहिती दिली. तसंच आंदोलकांवर कडक कारवाई केली जाईल अशी माहिती दिली.

४) बिहारचे पोलीस प्रमुख राज करण नय्यर यांनी आंदोलकांची ओळख पटवण्यासाठी व्हिडीओ पाहिले जात असल्याचं सांगितलं आहे. ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.

५) बिहारमधील मोहीउद्दीनगर स्थानकावर उभ्या जम्मू तावी एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना आग लावण्याची आली. यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही.

६) बिहार आणि उत्तर प्रदेशातील अनेक ठिकाणी हे आंदोलन पेटत आहे. भाजपाची सत्ता असणाऱ्या हरियाणा आणि मध्य प्रदेशातही हे आंदोलनाचं लोण पसरण्याची शक्यता आहे.

७) ‘अग्निपथ’ योजनेंतर्गत चार वर्षांसाठी ‘अग्निवीरां’ची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने मंगळवारी केली होती. त्यानंतर बिहारमध्ये या योजनेच्या निषेधाचा सूर उमटला. त्याचे लोण गुरुवारी उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, जम्मू, हिमाचल प्रदेश, झारखंड, राजस्थान, मध्यप्रदेशपर्यंत पोहोचले. बिहारमधील बहुतांश जिल्ह्य़ांमध्ये तरुणांनी रेल्वेमार्ग आणि रस्त्यांवर जाळपोळ केली. भाजपाच्या एका आमदाराच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. आंदोलकांनी आरा रेल्वे स्थानकावर एका रेल्वेइंजिनाला आग लावली. छाप्रा, भबुआ रेल्वे स्थानकांतही आंदोलकांनी मोडतोड केली. आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडाव्या लागल्या.

८) भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री ‘अग्निपथ’ योजनेचे कौतुक करून प्रचार करत असताना बिहारमध्ये सत्ताधारी आघाडीतील संयुक्त जनता दलाने वेगळी भूमिका घेतली. ‘‘हिंसाचाराचे समर्थन करता येणार नाही. पण, या आंदोलकांचे म्हणणे ऐकायला हवे’’, असे पक्षाने म्हटले आहे. या योजनेवर थेट टीका न करता आंदोलकांची बाजू ऐकण्याची गरज व्यक्त करत संयुक्त जनता दलाने भाजपची कोंडी केली.

९) ‘अग्निपथ’ योजनेवरून तरुणांचा रोष आणि विरोधकांच्या टीकेला सामोरे जाणाऱ्या केंद्र सरकारने एक पाऊल मागे घेतले. या योजनेंतर्गत सैन्यभरतीसाठी वयोमर्यादा २१ वरून २३ करण्याचा निर्णय केंद्राने घेतला. या योजनेमुळे संरक्षण दलाला नवे सामर्थ्य मिळेल, असा दावा करत सरकारने योजनेचे फायदे अधोरेखित केले. चार वर्षांच्या सेवेनंतर ‘अग्निवीरां’ना ११. ७१ लाखांचा सेवानिधी, बँक कर्ज योजनेचा लाभ, बारावीच्या समकक्ष प्रमाणपत्र मिळणार आहे, याकडे केंद्राने लक्ष वेधले. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य पोलीस दलांत ‘अग्निवीरां’ना प्राधान्य देण्यात येईल, असेही केंद्राने स्पष्ट केले.

१०) ‘अग्निपथ’ योजनेवर काँग्रेससह विरोधकांनी जोरदार टीका केली़ तरुणांना ‘अग्निपथा’वर चालायला लावून त्यांच्या संयमाची ‘अग्निपरीक्षा’ घेऊ नका, असे आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना केले. तरुणांचा स्वप्नभंग करू नका, असे सांगत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही सरकारला लक्ष्य केले. माकप, भाकप, समाजवादी पक्ष, बसप आदी पक्षांनीही केंद्रावर टीका केली़ ‘अग्निपथ’ योजनेविरोधात उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्यांत शनिवारी आंदोलन करण्याची घोषणा राष्ट्रीय लोकदलाने केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Agnipath protests intensify trains set on fire in bihar uttar pradesh sgy

Next Story
National Herald: मला रुग्णालयात दाखल आईची काळजी घ्यायची आहे; राहुल गांधींची ईडीकडे विनंती
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी