‘ऑगस्टा वेस्टलँड’च्या हेलिकॉप्टर विक्रीचा ५५ कोटी ६० लाख युरो डॉलरचा करार भारताकडून पदरात पाडून घ्यायचा असेल तर सोनिया गांधी आणि त्यांच्या निकटवर्तीयांना राजी करावे लागेल, अशी सूचना या लाचखोरी प्रकरणातील मुख्य आरोपी व या करारातील तीनपैकी एक मध्यस्थ असलेल्या ख्रिश्चन मायकेल याने मार्च २००८मध्ये पाठविल्याचे इटालीच्या न्यायालयात उघड झाले आहे. या करारासाठी भारतात नेते व अधिकाऱ्यांवर कराव्या लागणाऱ्या ‘खर्चा’चा हॅश्क या अन्य दलालाने मांडलेला तपशीलही न्यायालयात ठेवला गेला असून त्यात ‘ए पी’ या नावे तीस लाख युरो तर ‘फॅम’ म्हणजे फॅमिली या नावे दीड कोटी युरोची अपेक्षित बिदागी दाखविण्यात आली आहे.
ऑगस्टा वेस्टलँड ही अँग्लो-इटालियन कंपनी असल्याने भारतीय नेत्यांना राजी करण्यासाठी ब्रिटनच्या भारतातील उच्चायुक्तांची मदत घेण्याचे पत्र मायकेल याने मार्च २००८मध्ये ऑगस्टा वेस्टलँडचे भारतातील तत्कालीन अध्यक्ष पीटर फ्युलेट यांना पाठविले होते. त्यात सोनिया व सल्लागारांना राजी करण्याची सूचना होती. या सल्लागारांत मनमोहन सिंग, अहमद पटेल, प्रणब मुखर्जी, वीरप्पा मोइली, ऑस्कर फर्नाडिस, सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणन आणि विनय सिंग यांची नावे होती. या पत्रातील सूचनेनुसार पुढे कार्यवाही झाली काय, हे आत्ताच्या सुनावणीत उघड झाले नसले तरी या पत्रानंतर दोन वर्षांनी म्हणजे फेब्रुवारी २०१०मध्ये भारताने या कंपनीशी हेलिकॉप्टर खरेदीचा करार केला होता.
विशेष म्हणजे सोनिया या आता ‘एमआय-८’ या हेलिकॉप्टरमधून जाण्यास राजी नाहीत. आता व्हीआयपी हेलिकॉप्टरला त्यांचेच पाठबळ लाभणार आहे, असेही मायकेल याने लिहिले होते. ही सर्व कागदपत्रे इटालियन तपास यंत्रणांनी भारतीय गुप्तचर विभागालाही दिली आहेत.
स्वित्र्झलड येथील मध्यस्थ ज्युइडो राल्फ हॅश्क याच्या कार्यालयात हस्तगत केलेल्या कागदपत्रांत मायकेल याचे पत्र हाती लागले आहे. हॅश्क हासुद्धा लाचखोरी खटल्यातला आरोपी आहे.
हॅश्कची भारतीय नेते व अधिकाऱ्यांशी सलगी होती. त्यामुळे या नेत्यांवरील ‘खर्चा’ची जबाबदारी त्याच्यावर होती. त्याच्याकडे सापडलेल्या कागदांत नेते व अधिकाऱ्यांना द्यायच्या बिदागीचा तपशील आहे.
त्यात ‘एपी’, ‘फॅमिली’ अशा आद्याक्षरांसह रकमा लिहिलेल्या आहेत. एपी म्हणजे सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल आहेत काय, असा प्रश्न न्यायालयात वकिलाने हॅश्क याला केला व सोनिया आणि पटेल यांचे छायाचित्रही दाखविले. त्यातील सोनिया यांनाच केवळ हॅश्क याने ओळखले.
करार मोडीत
फेब्रुवारी २०१०मध्ये भारताने या कंपनीशी हेलिकॉप्टर खरेदीचा करार केला होता. मात्र कंपनीने करारातील शर्तीचा भंग केल्याचे सांगत संरक्षण मंत्रालयाने अलीकडेच करार मोडीत काढला होता. मात्र ऑगस्टा वेस्टलँडकडून भारताने तोवर १२पैकी तीन हेलिकॉप्टर विकत घेतली होती आणि त्यासाठी एकूण करारापैकी ४५ टक्के रक्कमही अदा केली होती.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Feb 2014 रोजी प्रकाशित
ऑगस्टा दुसरे बोफोर्स?
‘ऑगस्टा वेस्टलँड’च्या हेलिकॉप्टर विक्रीचा ५५ कोटी ६० लाख युरो डॉलरचा करार भारताकडून पदरात पाडून घ्यायचा असेल तर सोनिया गांधी आणि त्यांच्या निकटवर्तीयांना राजी करावे लागेल
First published on: 02-02-2014 at 12:21 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agustawestland another bofors scam