Ahmadabad Air India Plane Crash : लंडनला निघालेले एअर इंडियाचे अहमदाबादच्या मेघानीनगर निवासी परिसरात कोसळलं आणि हाहाकार उडाला. या विमानात एकूण २४२ प्रवासी, १० क्रू मेंबर्स आणि दोन वैमानिक होते. त्यापैकी फक्त एक प्रवासी वाचला असून इतर सर्वांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान दुर्घटनाग्रस्त झालेलं विमान हे बोइंग कंपनीचे होते. या विमानाबद्दल आता अमेरिकन प्रशासनातील अधिकाऱ्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ज्या विमानाचा अपघात झाला त्याचा वापर बंद कण्याचा कोणताही विचार नसल्याचे अमेरिकेच्या प्रशासकिय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

अमेरिकन अधिकार्‍यांनी गुरूवारी बोइंग ७८७ विमानाचा वापर थांबवण्याची आवश्यकता वाटेल असा कोणताही तात्काळ सुरक्षा डेटा आढळून आला नाही असे सांगितले आहे. ट्रान्सपोर्टेशन सेक्रेटरी शॉन डफी आणि फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनचे प्रमुख ख्रिस रोचेल्यू यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात वक्तव्य केले . यावेळी त्यांनी या भीषण दुर्घटनेचे व्हिडीओ आपण पाहिली असल्याचेही सांगितले .

डफी यांनी सांगितलं की, त्यांनी नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डच्या प्रमुख जेनिफर होमेंडी यांच्याशी चर्चा केली. तसेच एनटीएसबी आणि एफएए टीम ही बोइंग आणि इंजिन निर्माता जीई एअरोस्पेस यांच्या मदतीने भारतात जाणार होती, असेही ते म्हणाले.

नेमकं काय म्हणाले?

“त्यांना घटनास्थळी जाऊन पाहाणी करावी लागेल. पण तरीही सध्या हे खूपच घाईचे ठरेल. लोक व्हिडीओ बघून नेमकं काय झालं याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करत आहेत, जे काही घडले त्यावर निर्णय घेण्यासाठी शहाणपणाचा मार्ग नाही.”

डफी यांनी सांगितलं की, एफएए दुर्घटनेच्या तपासाचा भाग म्हणून बोइंग आणि जीई यांच्याबरोबर मिळून सध्या समोर आलेल्या माहितीचा आढावा घेत आहे. तसेच त्यांनी अमेरिकन सरकार सुरक्षेसंबंधी समोर येणार्‍या कोणत्याही शिफारस लागू करण्यास मागेपुढे पाहाणार नाही, यावर देखील डफी यांनी जोर दिला. तसेच आम्ही सत्याचा पाठपुरावा करू आणि सुरक्षेला प्राधान्य देऊ असेही ते म्हणाले.

रोचेल्यू म्हणाले की, “आम्ही तपासात पुढे जात असताना, जर आम्हाला कोणत्याही धोक्यांबद्दल काही माहिती मिळाली तर आम्ही ते धोके कमी करू.”

डफी म्हणाले की “एफएए विमान प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक डेटा मिळवण्याकरिता अतिरिक्त रिसोर्सेस पाठवण्यास तयार आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.