Ahmedabad Student Murder : अहमदाबादच्या एका खाजगी शाळेत १०वीच्या विद्यार्थ्याची त्याच्याच शाळेत शिकणाऱ्या खालच्या वर्गातील एका विद्यार्थ्याने चाकून भोसकून हत्या केल्याचा प्रकार समोर आला होता.दरम्यान यानंतर या हत्येतील आरोपीची त्याच्या एका मित्राबरोबरची चॅटिंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या चॅटमध्ये आरोपी हा त्याच्या गुन्ह्याची कबुली देताना दिसत आहे. या चॅटचे स्क्रिनशॉट सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

चॅटमध्ये नेमकं काय संभाषण झालं?

पोलिसांना या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे, जो ९वीच्या वर्गातील विद्यार्थी आहे. या आरोपीने इंस्टाग्रामवर त्याच्या मित्राशी केलेलं चॅटिंग सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.


मित्र : भाई तुने कुछ किया आज? (भावा आज तू काहीतरी केलंस का?)
आरोपी : होय
मित्र : भाई तुमने चाकु मारा था? (भावा, तू चाकूने भोसकलंस का?)
आरोपी :तुला कोणी सांगितलं?
मित्र : एक मिनीट कॉल कर. कॉलवर बोलू.
आरोपी : नाही नाही
मित्र : चॅटवर हे सगळं नको. माझ्या डोक्यात तुझं नाव पहिल्यांदा आलं. त्यामुळे तुला मेसेज केला.
आरोपी : आत्ता मोठा भाऊ आहे सोबत. त्याला माहिती नाही. कोणी सांगितलं.
मित्र : बहुतेक तो मेला.
आरोपी : खरंच. पण कोण होता तो?
मित्र : चाकू तू मारला होता का? मी ते विचारत आहे.
आरोपी : होय.

“९वीच्या वर्गातील एका विद्यार्थ्याने एका १०वीतील विद्यार्थ्याची अहमदाबादच्या सेवंथ डे स्कूलमध्ये हत्या केली, ही एक दुर्दैवी घटना आहे आणि एका सुसंस्कृत समाजासाठी हा एक धोक्याचा इशारा आहे,” असे गुजरातचे शिक्षणमंत्री प्रफुल पानशेरिया यांनी एका व्हिडीओ संदेशात म्हटले.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांकडून या व्हायरल होत असलेल्या चॅटची सत्यता पडताळली जात आहे.