Vijay Rupani on Air India Flight Crashes near Ahmedabad : गुजरातमधील अहमदाबाद शहरातील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळापासून सात किलोमीटर अंतरावर मेघानी नगर परिसरात एक प्रवासी विमान कोसळल्याची भीषण दुर्घटना समोर आली आहे. एअर इंडियाचं हे विमान १२ क्रू सदस्यांसह २४२ प्रवाशांना घेऊन अहमदाबादवरून लंडनला जात होतं. तसेच हे विमान रहिवासी भागात कोसळल्यामुळे मोठी जीवितहानी झाली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणतंही अधिकृत वृत्त समोर आलेलं नाही.

एअर इंडियाच्या एआय-१७१ (बोइंग ७८७-८ ड्रीमलायनर विमान – सीरियल नंबर ३६२७९) या प्रवासी विमानाने अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काहीच मिनिटात (७ किमी दूर) ते कोसळलं. विमानाचे पंख तुटून बाजूला पडल्याचं व्हिडीओंमध्ये दिसतंय. दरम्यान, अहमदाबाद पोलीस व अग्निशमन दलाने बचावकार्य सुरू केलं आहे. विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट होऊन विमानाने पेट घेतला आहे. त्यामुळे घटनास्थळावरून आगीचे लोळ उठत असल्याचं दिसतंय. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या सात गाड्या व बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचं काम चालू आहे. तसेच आपत्कालीन बचाव पथकाने बचावकार्याला सुरुवात केली आहे. यासह सीमा सुरक्षा दल व एनडीआरएफची पथकं देखील घटनास्थळी दाखल झाली आहेत.

प्रवाशांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींचाही समावेश

दरम्यान, आणखी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील या विमानाने प्रवास करत होते. त्यांचं तिकीट देखील समोर आलं आहे. या विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या नावांची यादी समोर आली असून त्यामध्ये विजय रुपाणी हे नाव आहे. तसेच डेक्कन क्रॉनिकलने रुपाणी यांचा बोर्डिंग पास देखील प्रसिद्ध केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
विमानातील प्रवाशांची यादी

या विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या नावांची यादी (Boarded Passenger) समोर आली असून यामध्ये १२ व्या नंबरवर विजय रमणिकलाल रुपाणी असं नाव आहे. २ डी हा त्यांचा सीट नंबर होता. या विमानाने दुपारी १.३८ वाजता अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केलं होतं. त्यानंतर अवघ्या दोनच मिनिटात १ वाजून ४० मिनिटांनी हे विमान कोसळलं. विमानतळाच्या सीमेजवळच ही दुर्घटना घडली.