एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी इंधन दरवाढ आणि सीमेवर चीनच्या वाढत्या कुरापतीवरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान सर्व गोष्टींबद्दल बोलतात, परंतु ते दोन गोष्टींबाबत कधीच बोलत नाही. पहिलं म्हणजे इंधनाच्या दराने गाठलेली शंभरी आणि दुसरं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) चिनी आक्रमकतेमुळे निर्माण झालेला धोका, असं त्यांनी म्हटलंय. ते हैदराबादमध्ये बोलत होते.

“जेव्हा पाकिस्तानने पुलवामावर हल्ला केला, तेव्हा पंतप्रधान मोदी म्हणाले ‘घर मे घुसके मारेंगे’ (आम्ही शत्रूला त्यांच्या हद्दीत घुसून मारू). आता चीन आमच्या अंगणात येऊन बसला आहे आणि मोदी मात्र काहीच करत नाही,” असा आरोप ओवैसी यांनी केला. यावेळी जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये झालेल्या वाढीबद्दल ओवैसींनी केंद्रावर हल्लाबोल केला. गेल्या आठवड्यात काश्मीरमध्ये अनेक नागरिकांची हत्या करण्यात आली, तसेच पूंछमधील चकमकीत लष्कराच्या नऊ जवानांचा मृत्यू झाला. “आमचे नऊ सैनिक काश्मीमध्ये मारले गेले आणि आपण २४ ऑक्टोबरला पाकिस्तान सोबत टी -२० सामना खेळणार आहोत,” ए असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सर्व ठीक झालंय, असा दावा पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी केला होता. मात्र, आता एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे नागरिकांच्या हत्या होत आहेत, याबद्दल पंतप्रधान आणि गृहमंत्री काही बोलणार का, असा सवाल ओवैसी यांनी केला. दरम्यान, काश्मीर खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी हल्ले वाढले आहे. गेल्या दोन ते तीन आठवड्यात तब्बल ११ नागरिकांना लक्ष्य करून मारण्यात आलंय. दोन दिवसांपूर्वी बिहारमधील दोन मजुरांची दहशतवाद्यांनी हत्या केली आहे.