सेक्युलर म्हणवणाऱ्यांना स्वतःचे आई वडिल कोण हे देखील ठाऊक नसते अशी पातळी सोडणारी टीका सोमवारी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केली होती. ज्यानंतर आता संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. AIMIM चे नेते गुरुशांत पट्टेदार यांनी तर अनंतकुमार हेगडे यांच्या जीभ छाटणाऱ्याला १ कोटी रूपये इनाम जाहीर केले आहे. अनंतकुमार हेगडे यांनी सेक्युलर, तसेच मागासवर्गीयांबाबत केलेले वक्तव्य अक्षम्य आहे. अल्पसंख्यकांचाही अपमान केला आहे. त्याचमुळे ही घोषणा करतो, अशी पातळी सोडून बोलणाऱ्या हेगडेंची जीभ कापून जो कोणी मला देईल त्याला १ कोटी रूपये इनाम म्हणून देईन. या आधी सिनेअभिनेते प्रकाश राज यांनीही हेगडेंवर टीका करत त्यांना धर्मनिरपेक्ष म्हणजे काय? सेक्युलर म्हणजे काय ? हे समजत नसल्याचे म्हटले आहे. कर्नाटकातील स्थानिक वृत्तवाहिनीने या संदर्भातले वृत्त दिले.
मी धर्मनिरपेक्ष आहे असे सांगत फिरण्यापेक्षा मी हिंदू आहे, मी मुस्लिम आहे, मी बौद्ध आहे अशी जातीवाचक किंवा धर्म सांगणारी ओळख दिली तर ती निश्चितच अभिमानाची बाब असेल असेही अनंतकुमार हेगडे यांनी म्हटले होते. आता मात्र त्यांच्यावर चांगलीच टीका होताना दिसते आहे. अनंतकुमार हेगडे यांनी वाचाळपणा दाखवण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी टिपू सुलतान हा क्रूर आणि बलात्कारी शासक होता असे म्हणत त्यांनी टिपू सुलतानच्या जयंतीलाही विरोध केला होता. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यासाठीच ते प्रसिद्ध आहेत.
सोमवारी हुबळी येथे झालेल्या एका सभेत त्यांनी सेक्युलर म्हणवणाऱ्यांचा समाचार घेतला. ज्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मात्र अनंतकुमार हेगडेंच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. हेगडे हे एखाद्या गावाचे सरपंचही होऊ शकत नाहीत, अशात त्यांना केंद्रीय मंत्रीपद दिले. हेगडे यांना संस्कृती आणि संसदेचे ज्ञान नाही अशीही टीका सिद्धरामय्यांनी केली.आता एमआयएमनेही या वादात उडी घेतली. अनंतकुमार हेगडेची जीभ छाटून आणणाऱ्याला एक कोटींचे बक्षीस देईन अशी घोषणाच गुरुशांत पट्टेदार यांनी केली.