एअर इंडियाच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या ‘ड्रीमलायनर’ या विमानांमध्ये सुरुवातीपासूनच काही ना काही बिघाड होत आले आहेत. खिडकीची काच तडकणे ही तर जणू नित्याची बाब बनली असावी. मंगळवारी कोलकात्याला जाणाऱ्या ड्रीमलायनर विमानाच्या कॉकपिटमधील एक काच तडकल्याचे पायलटच्या लक्षात आल्यावर त्याने तातडीने विमान कोलकात्यात उतरवले. सुदैवाने कोणताही अनवस्था प्रसंग उद्भवला नाही; परंतु ड्रीमलायनरच्या सुरक्षेबाबतचे प्रश्नचिन्ह या घटनेने आणखीनच गडद केले.
कोलकात्याला जाणाऱ्या एआय-०२० या विमानाच्या कॉकपिटमधील उजव्या बाजूच्या खिडकीच्या बाहेरील बाजूची काच तडकल्याचे वैमानिकाच्या ध्यानात आले. सुदैवाने या खिडकीची आतील काच सुरक्षित होती. त्यामुळे विमान कोलकात्यालाच उतरवण्याचा निर्णय त्याने घेतला. विमानाच्या कॉकपिटची खिडकी काचांच्या अनेक थरांनी बनलेली असते. या थरांची जाडी सुमारे २ इंचांची असते. विमानाचा वेग, उंच आकाशातील अतिथंड ते जमिनीजवळील उष्ण तापमानातील फरक, पक्ष्यांची धडक आदी विविध संकटांना तोंड देण्याची क्षमता या काचांची असते. केबिनमधील हवेचा दाब स्थिर ठेवण्याचे कामही या काचा करतात. सुदैवाने एआय-०२० ची बाह्य़ काचच तडकल्याने फार अनवस्था प्रसंग उद्भवला नाही.
एअर इंडियाच्या ताफ्यातील ड्रीमलायनर विमानांच्या खिडक्यांची काच तडकण्याचे अनेक प्रकार आजवर घडले आहेत. गेल्याच महिन्यात दिल्लीहून फ्रँकफर्टला निघालेल्या विमानाची काच तडकल्याने ते परत बोलवावे लागले होते. तर मागील नोव्हेंबर महिन्यात दिल्लीहून मेलबर्नला चाललेल्या विमानाची काचही अशीच तडकली होती. याव्यतिरिक्त ड्रीमलायनरमध्ये अन्य अनेक तांत्रिक घोळही आहेत. ही विमाने बनवणाऱ्या बोइंग कंपनीशी एअर इंडियाने संपर्क साधला असून बोइंगने दुरुस्तीसाठी आपल्या तंत्रज्ञांचे एक पथक सध्या भारतात ठेवले आह़े

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air india dreamliner windshield develops cracks
First published on: 19-06-2014 at 12:49 IST