Air India Flight News: फुकेटहून दिल्लीच्या दिशेनं निघालेल्या एअर इंडियाच्या AI 379 या विमानाचं थायलंडमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळल्याच्या घटनेला २४ तास व्हायच्या आतच थायलंडमध्ये हे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्यामुळे प्रवाशांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र, विमानाचं लँडिंग कोणत्याही तांत्रिक बिघाडामुळे करण्यात आलेलं नसून विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या धमकीमुळे करण्यात आल्याचं फुकेट विमानतळ प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.

यासंदर्भात विमातळ प्रशासनाने रॉयटर्सला दिलेल्या वृ्त्तानुसार, अशा परिस्थितीत स्टँडर्ड प्रोटोकॉल्सनुसार विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं होतं. यानंतर विमानातील प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी आली तेव्हा विमानात १५६ प्रवासी होते अशी माहिती थायलंड विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

फुकेट ते दिल्ली विमान प्रवास

हे विमान भारतीय प्रमाणवेळेनुसार शुक्रवारी सकाळी ९.३० च्या सुमारास फुकेटहून दिल्लीच्या दिशेनं निघालं होतं. पण विमान हवेत असतानाच बॉम्ब ठेवल्याची धमकी आल्यानंतर अंदमान समुद्रात एक मोठी गिरकी घेऊन विमान पुन्हा फुकेट विमानतळावर आणण्यात आलं.

दरम्यान, विमानातील इतर तपासणी सध्या चालू असून त्यानंतरच सविस्तर माहिती दिली जाईल, असं फुकेट विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

एअर इंडियाकडून अद्याप निवेदन नाही

विमानाच्या इमर्जन्सी लँडिंगसंदर्भात एअर इंडियानं अद्याप कोणतंही अधिकृत निवेदन दिलेलं नाही. थायलंडमधील स्थानिक प्रशासनाकडून बॉम्बच्या धमकीचा तपास केला जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या वर्षीदेखील पहिल्या १० महिन्यांत अनेक भारतीय विमान कंपन्या व विमानतळांना अशाच प्रकारच्या धमक्यांचे फोन आले होते. मात्र, चौकशीअंती त्यात कोणतंही तथ्य आढळून आलं नाही. हे प्रमाण जवळपास एक हजारपर्यंत असून २०२२ मध्ये आलेल्या अशा फोनकॉलपेक्षा हे प्रमाण तब्बल १० पट जास्त होतं.