San Fransisco-Mumbai Air India Flight: अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या बोईंग ७८७ ड्रीमलायनर श्रेणीतील प्रवासी विमानाला १२ जून रोजी भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत विमानातील २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला असून फक्त एका प्रवाशाचा जीव वाचला आहे. या दुर्घटनेच्या कारणांचा सध्या शोध घेतला जात आहे. मात्र, या दुर्घटनेपासून गेल्या पाच दिवसांत जगभरात काही ठिकाणी बोईंग विमानातील तांत्रिक समस्यांच्या घटना समोर आल्या आहेत. भारतात एअर इंडियाच्या काही विमानांचं तांत्रिक बिघाडामुळे इमर्जन्सी लँडिंग केल्याचंही समोर आलं आहे. याच घटनांमधील आणखी एक घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली.
सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईच्या दिशेनं निघालेल्या एअर इंडियाच्या AI180 या विमानाचं सोमवारी मध्यरात्री नियोजित वेळेत १२ वाजून ४५ मिनिटांनी लँडिंग झालं. पण विमानाच्या डाव्या इंजिनमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे कोलकात्याहून मुंबईच्या दिशेनं विमानाचं उड्डाण लांबलं. जवळपास चार तासांहून अधिक काळ विमानतळावरच थांबल्यानंतरही सदर तांत्रिक समस्या दुरूस्त न झाल्यामुळे विमानातील सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं. सुरक्षेचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वैमानिकानं प्रवाशांना दिली.
सोमवारी दिवसभरात तीन घटना
दरम्यान, सोमवारी मध्यरात्री कोलकाता विमानतळावर या सर्व घडामोडी घडण्याआधी दिवसभरात तीन वेळा एअर इंडियाच्या विमानांचं इमर्जन्सी लँडिंग किंवा पुन्हा मूळ विमानतळावर लँडिंग करण्याची वेळ ओढवली. सोमवारी सकाळी मुंबईहून अहमदाबादला जाणाऱ्या AI2493 या विमानाचं उड्डाण रद्द करण्यात आलं. व्यवस्थेतील काही अडचणींमुळे विमान उड्डाणासाठी उशीर झाला. यादरम्यान या विमानातील क्रू मेंबर्सचा रोजचा उड्डाणाचा ठरलेला कालावधी संपला. त्यामुळे या विमानाचं उड्डाण रद्द करण्यात आलं.
दुसरीकडे दिल्लीहून रांचीच्या दिशेनं निघालेलं एअर इंडियाचं विमान तांत्रिक बिघाडाच्या संशयामुळे पुन्हा दिल्लीला लँड करण्यात आलं. बोईंग ७३७-८ श्रेणीतील विमान रांचीतील बिरसा मुंडा विमानतळावर संध्याकाळी ६ वाजून २० मिनिटांनी उतरणं अपेक्षित होतं. पण टेकऑफ केल्यानंतर काही वेळातच विमानात तांत्रिक बिघाडाची शंका उपस्थित झाल्यानंतर ते पुन्हा दिल्ली विमानतळावर लँड करण्यात आलं. विमानाची तपासणी केल्यानंतर उड्डाण नियोजनानुसार झाल्याचं एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितलं.
हाँगकाँग-दिल्ली विमानही माघारी फिरवलं!
सोमवारच्या दिवसातली अशा प्रकारची तिसरी घटना हाँगकाँगहून दिल्लीसाठी निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाच्या बाबतीत घडली. AI315 या एअर इंडियाच्या बोईंग ८७८-८ श्रेणीतील विमानानं टेकऑफ केल्यानंतर काही वेळातच पुन्हा हाँगकाँगला उतरवण्यात आलं. विमानात तांत्रिक समस्या उद्भवल्याची शंका वैमानिकाला आल्यानंतर त्यानं विमान माघारी वळवलं.