Air India Plane Crash Ahmedabad : अहमदाबादमध्ये १२ जून रोजी एअर इंडियाच्या विमानाची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत तब्बल २६५ जणांचा मृत्यू झाला. हे विमान अहमदाबादवरून लंडनला जात होतं. पण या विमानाने अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हे विमान डॉक्टरांच्या एका वसतिगृहावर कोसळलं. या दुर्घेटनेत विमानातील सर्व क्रू मेंबर्ससह २६५ जणांचा मृत्यू झाला. या मृतांमध्ये वसतिगृहातील काही डॉक्टरांचा देखील समावेश आहे.

दरम्यान, ही घटना घडल्यानंतर आता संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच या दुर्घटनेनंतर अनेक हृदय पिळवटून टाकणार्‍या कहाण्या समोर येत आहेत. ही घटना घडली तेव्हा काही विद्यार्थी डॉक्टर वसतिगृहातील कँटिनमध्ये दुपारचं जेवण करत होते. पण तेवढ्यात वसतिगृहावर विमान कोसळलं आणि भरल्या ताटावरच काहींच्या समोर मृत्यू उभा राहिला. या घटनेबाबत एका विद्यार्थी डॉक्टरने एक हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग सांगितला आहे.

एअर इंडियाचं विमान अहमदाबादच्या बी जे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या इमारतीवर कोसळण्याच्या आधी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास दोन्ही वैद्यकीय विद्यार्थी मेसमध्ये जेवण संपवत होते. तेव्हा एका विद्यार्थ्याने त्याचा मोबाईल त्याच्या २० वर्षीय मित्राकडे दिला आणि म्हटलं की, “तुम चलो, मैं हाथ धोकर आता हूं.” त्यानंतर तो पुढे गेला आणि दोन मिनिटांतच विमान वसतिगृहावर कोसळलं. फक्त दोन मिनिटांच्या फरकाने एका मित्राचा जीव वाचला आणि दोन मिनिटांच्या फरकाने एकाचा जीव गेला.

आर्यन असं या मित्राचं नाव होतं. आर्यन हात धुण्यासाठी मागेच राहिला आणि त्याच वेळी विमान इमारतीवर कोसळलं आणि सर्व काही संपलं. त्यानंतर त्याच मित्राने १० मिनिटांत आर्यनच्या कुटुंबियांना फोन केला आणि लवकर या आर्यन जखमी झाल्याचं सांगितलं. त्यानंतर आर्यनचं कुटुंब मध्य प्रदेशातील जिक्सौली गावातून अहमदाबादकडे ताबडतोब रवाना झालं. पण तेथे पोहोचेपर्यंत त्यांना विमान दुर्घटनेत आर्यनचा मृत्यू झाल्याची माहिती समजली आणि त्यांना मोठा धक्का बसला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ज्युनियर डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनचे सदस्य डॉ. धवल घमेती यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं की, “आर्यन हा एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता. विमान कोसळलं तेव्हा तो मेसमध्ये जेवण करत होता. पण त्याचा या घटनेत मृत्यू झाला. त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांना सोपवण्यात आला आहे.”