चीन आणि तैवान या दोन देशात विस्तव जात नाही. या दोन्ही देशातील शत्रुत्वाचा फटका इतर देशांनाही अनेकवेळा बसताना दिसतो. तैवानचे स्वतंत्र अस्तित्व दाखवायचे नाही ही चीनची मागणी अनेक देशांनी यापूर्वीच मान्य केली आहे. आता भारतही चीनसमोर झुकला असून एअर इंडियाने त्यांच्या वेबसाईटवर ‘तैवान’ ऐवजी ‘चायनीज तैपई’ असा उल्लेख केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिंगापूर एअरलाईन्स, जपान एअरलाईन्स, एअर कॅनडासह जगभरातील अनेक देशातील विमान कंपन्यांनी तैपई असा त्यांच्या वेबसाईटवर उल्लेख केला आहे. २५ एप्रिलला चीनच्या हवाई उड्डाण प्राधिकरणाने काढलेल्या आदेशात तैवानचा स्वतंत्र राष्ट्र म्हणून उल्लेख करू नये असे नमूद केले आहे.

शांघायमधील एअर इंडियाच्या कार्यालयाला चीन प्रशासनाकडून हे पत्र प्राप्त झाले. भारताने २५ जुलैपर्यंत बदल करण्यासाठी वेळ मागितला होता. या मुदतीनंतरही भारतासह अमेरिकन हवाई कंपनीनेही तैवानचे चीनपासून स्वतंत्र अस्तित्व दाखवले होते.

भारताच्या या भूमिकमुळे चिडलेल्या चीन हवाई प्राधिकरणाने वेबसाईट ब्लॉक करण्याचा इशारा दिला होता. काही भारतीय माध्यमे तैवान चीनचा भाग नसल्याचे म्हणत आहेत. चीनने भारतीय क्षेत्राबाबत भाष्य केले नसतानाही त्यांच्याकडून अशी वक्तव्ये येत आहेत. वन चीन पॉलिसीबाबत भारतीय नेत्यांनी बोलण्याची गरज नाही. त्यामुळे भारतीय कंपन्यांनीही याचे उल्लंघन करू नये. जर परदेशी कंपन्यांना चीनमध्ये व्यवसाय करायचा असेल किंवा त्यांची उत्पादने चीनच्या बाजारपेठेत आणायची असतील तर चीनची पॉलिसी त्यांनी मान्य करायला हवी, अशा शब्दांत ठणकावले होते. त्यानंतर भारताने आपल्या वेबसाईटवरून तैवान हे नाव हटवून चायनीज तैपई असा उल्लेख केला आहे.

या प्रकरणी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे संपर्क साधण्यात आल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे. चीनच्या अशा प्रकारच्या आग्रही भूमिकेचा भारतीय कंपन्यांवर भविष्यात काय फरक पडेल हे पाहण्यासारखे आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air india removed taiwan from the website after china pressure
First published on: 04-07-2018 at 20:23 IST